पुणे : राष्ट्रवादी माथाडी नेते संदीप मोहोळ याचा 2006 मध्ये खून झाला होता. या प्रकरणातील आरोपी गणेश मारणे याच्या खूनचा कट रचल्या प्रकरणी खडकी पोलिसांनी गँगस्टर शरद हिरामण मोहोळ याच्यासह पाच जणांना 2012 मध्ये अटक केली होती. गणेश मारणे याच्या खूनचा कट रचल्याच्या आरोपातून शरद मोहोळ याच्यासह पाच जणांची सत्र न्यायाधीश एस.बी. साळुंके यांनी मंगळवारी (दि.21) निर्दोष मुक्तता केली असल्याची माहिती अॅड. मयूर दोडके व अॅड. तानाजी सोलनकर यांनी दिली.
अनिल बार्शीराम खोले (रा. वडगाव बु. दत्तनगर, सिंहगड रोड), अजय तुकाराम कडू (रा. कोथरुड), विकास प्रभाकर पायगुडे (रा.एरंडवणे, कोथरुड), शरद हिरामण मोहोळ (रा. माऊली नगर, सुतारदरा कोथरुड) व अलोक शिवाजी भालेराव (रा. मु.पो. मुठा, मामासाहेब मोहोळ हायस्कूल जवळ, ता. मुळशी) अशी निर्दोष मुक्तता करण्यात आलेल्यांची नावे आहेत. सरकारी पक्षातर्फे एकूण 10 साक्षीदार तपासण्यात आले होते.
2006 साली राष्ट्रवादी माथाडी नेते संदीप मोहोळ यची हत्या झाली होती. या हत्येच्या गुन्ह्यात गणेश मारणे यास आरोपी म्हणून अटक करण्यात आली होती. शरद मोहोळ व इतर आरोपींनी गणेश मारणे याची न्यायालयात किंवा ससून हॉस्पिटल परिसरात हत्या करण्याचा कट रचल्याचा आरोप ठेवत खडकी पोलिसांनी आरोपींना 2012 साली अटक केली होती.
तसेच आरोपींनी शिवाजीनगर न्यायालय व ससून इस्पितळात त्यासाठी रेकी केल्याचे तपासात आढळून आले होते. पोलिसांनी गुन्ह्यात पिस्टल व जिवंत काडतुसे जप्त केली होती. सर्व आरोपीतर्फे न्यायालयात अॅड. तानाजी सोलनकर व अॅड. मयूर दोडके यांनी युक्तिवाद केला. आरोपींविरुद्ध सरकारी पक्षास गुन्हा सिद्ध करता आला नाही. भारतीय हत्यार कायद्यांतर्गत पोलिसांनी मंजुरी घेतली नाही. तसेच गणेश मारणे याचा पोलिसांनी जबाब नोंदविला नाही त्यामुळे आरोपींविरुद्ध गुन्हा सिद्ध करण्यास सरकारी पक्ष अपयशी ठरल्याचा युक्तिवाद आरोपींतर्फे करण्यात आला.