३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ५ लाख कोटी रुपयांचा फटका

0

मुंबई : फेडरल रिझर्व्हला व्याजदरवाढीची गती कायम ठेवावी लागणार असल्याचे संकेत अमेरिकेने दिले आहेत. याचे पदसाद आज शुक्रवारी (दि.६) भारतीय शेअर बाजारात उमटले. सेन्सेक्स, निफ्टीची आज सलग तिसऱ्या सत्रात घसरण झाली.

सकाळच्या व्यवहारात सेन्सेक्स २६० अंकांनी घसरून ६० हजारांवर होता. तर निफ्टी १८ हजारांच्या खाली घसरला होता. दुपारच्या सत्रात सेन्सेक्सची घसरण वाढत जाऊन ती ६३६ अंकांहून अधिक झाली. त्यानंतर सेन्सेक्स ४५२ अंकांच्या घसरणीसह ५९,९०० वर बंद झाला. तर निफ्टी १३२ अंकांनी खाली येऊन १७,८५९ वर स्थिरावला.

सलग तीन दिवसांत सेन्सेक्सने सुमारे १६०० अंक गमावले आहेत. यामुळे बीएसईचे बाजार भांडवल (market capitalisation) सुमारे ५ लाख कोटी रुपयांनी कमी झाले आहे. फेडरल रिझर्व्हला व्याजदरवाढीची गती कायम ठेवावी लागणार असल्याचे संकेत अमेरिकेच्या मजबूत डेटाने दिल्यानंतर गुंतवणूकदार सावध झाले आहेत. आजच्या घसरणीमुळे बीएसई बाजार भांडवलात २.२४ लाख कोटींची घट झाली आहे. कालच्या २८१.९५ लाख कोटींच्या तुलनेत बाजार भांडवल २७९.७१ लाख कोटींपर्यंत खाली आले आहे. एकूण तीन सत्रांतील घसरणीमुळे गुंतवणूकदारांना ४.९४ लाख कोटींचा फटका बसला आहे. आयसीआयसीआय बँक, टीसीएस, इन्फोसिस, एचडीएफसी आणि एचडीएफसी बँक, कोटक महिंद्रा बँक, बजाज फायनान्स, एसबीआय, अॅक्सिस बँक आणि एअरटेल या आघाडीच्या शेअर्संना मोठा फटका बसला आहे.

बहुतांश क्षेत्रीय निर्देशांकांत घसरण दिसून आली. सोमवारपासून सुरू होणार्‍या तिसऱ्या तिमाहीपूर्वी माहिती तंत्रज्ञान स्टॉक्स घसरले. बजाज फिनसर्व्ह आणि बजाज फायनान्सच्या शेअर्समध्ये घसरण सुरुच आहे. यामुळे सलग तिसऱ्या दिवशी या शेअर्संना मोठा फटका बसला. बजाज फिनसर्व्ह २.३ टक्क्यांनी खाली आला, तर बजाज फायनान्स १.५ टक्क्याने घसरला. यामुळे बजाज फायनान्स शेअर गुंतवणूकदारांचे २ दिवसात ३३ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. काल गुरुवारी Bajaj Finance चे शेअर्स ७.२ टक्क्यांनी खाली आले होते. आज ते २.६ टक्क्यांनी घसरले. यामुळे हा शेअर्स ५,९४१ रुपयांवर आला.

निफ्टी मिडकॅप ५० हा ०.९८ टक्के आणि स्मॉलकॅप ५० हा १.०१टक्क्यांनी घसरला. तब्बल २८ स्टॉक्सनी आज ५२ आठवड्यांच्या निचांकी पातळी गाठली. ३,५६४ स्टॉक्सपैकी २,२०४ स्टॉक्समध्ये घसरण दिसून आली. केवळ १,२२७ स्टॉक्स वधारले होते. तर १४१ स्टॉक्समध्ये काही बदल दिसून आला नाही.

सेन्सेक्सवर आयसीआयसीआय बँक, टीसीएस, इन्फोसिस, कोटक बँक, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, एचडीएफसी बँक, भारती एअरटेल, एशियन पेंट्स यांचे शेअर्स घसरले. तर एनएसईवर द न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी लि., जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, एमएमटीसी लि., सीसीएल प्रॉडक्ट्स इंडिया लि., एलआयसी हाऊसिंग फायनान्स लि., बिर्ला कॉर्पोरेशन हे टॉप लूजर्स होते. परदेशी गुंतवणूकदारांकडून सुरु असलेला विक्रीचा सपाटा आणि कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ हे घटकदेखील बाजाराच्या घसरणीला कारणीभूत ठरले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.