52 सीसीटीव्ही फुटेज तपासून पकडला सराईत गुन्हेगार
वाचा कोणते गुन्हे आणले उघडकीस; हिंजवडी पोलिसांची कामगिरी
पिंपरी : रस्त्यावरुन जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोने चोरीला गेल्याचा तपास करत असताना पोलिसांनी तब्बल 52 ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. यावरून एका सराईत गुन्हेगाराला अटक करुन त्याच्याकडून सोनसाखळी हिसकवण्याचे 14 तर वाहन चोरीचे दोन असे 16 गुन्हे उघडकीस आणले. ही कामगिरी हिंजवडी पोलिसांनी केली आहे.
आकाश वजीर राठोड (22, रा.मूलखेड, ता. मुळशी, जि. पुणे) याला आणि सोने विकत घेणारा राजस्थान येथील सराफ सोमपाल नारायण सिंह (31) या दोघांना अटक केलेली आहे.
अप्पर पोलीस आयुक्त संजय शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार; हिंजवडी येथील हैदराबाद बिर्याणी हाऊस समोर रस्त्याने जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने हिसका मारुन चोरुन नेले होते.गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी तपासी पथकाला तत्काळ तपासाचे आदेश दिले. तपासी पथकाने परिसरातील तब्बल 52 सीसीटीव्ही फुटेज तपासले. दरम्यान सराईत गुन्हेगार राठोड हा कारागृहातुन बाहेर आलेला असून हा गुन्हा त्यानेच केला असण्याची माहिती सहाय्यक निरीक्षक सागर काटे यांना मिळाली.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवल्या. त्यावेळी त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच त्याने इतरही 13 सोनसाखळी चोरीचे आणि दोन वाहन चोरीचे गुन्हे कबूल केले. पोलिसांनी 22 तोळे सोने आणि दोन दुचाकी असा 11 लाख 71 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त संजय शिंदे, उपायुक्त काकासाहेब डोळे, सहाय्यक आयुक्त श्रीकांत डिसले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, सोन्याबापू देशमुख, सुनील दहिफळे, तपासी पथकाचे सहायक निरीक्षक सागर काटे, राम गोमारे यांच्या पथकाने केली आहे.