पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मोबाईल क्रमांकाचा वापर करून पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाकडे वीस लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हे शाखेच्या युनिट 1 पथकाने ही कारवाई केली. त्यासोबतच वाडेबोलाइ येथील जागेचा वाद सोडविण्यासाठी धमकी देखील देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
नवनाथ भाऊसाहेब चोरमले, सौरभ नारायण काकडे, सुनील उर्फ बाळा गौतम वाघमारे, किरण रामभाऊ काकडे, आकाश शरद निकाळजे, चैतन्य राजेंद्र वाघमारे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. एका बांधकाम व्यावसायिकाने या प्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मागील दहा दिवसांपासून हा प्रकार सुरू होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटकेत असलेल्या आरोपींनी संगणमत करून गूगल प्ले स्टोर वरून फेक कॉल ॲप नावाचे ॲप डाऊनलोड केले. याच्या मदतीने त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मोबाईल क्रमांकचा वापर करून बांधकाम व्यावसायिकाला फोन केला. आणि अजित पवार यांचा पीए चौगुले बोलतोय असं सांगून वीस लाख रुपये देण्याची मागणी केली.
तसेच वाडेबोलाइ येथील बाबा चोरमले आणि इतर नऊ जणांच्या मालकीच्या जमिनीचा वाद मिटवून टाका असे सांगितले होते. दरम्यान या प्रकरणी तक्रार आल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत गुन्हा दाखल केला आणि आरोपींना अटक केली आहे.