पुणे : हिंजवडी परिसरातील एका फ्लॅटमध्ये बसुन आयपीएल क्रिकेट मॅचवर मोठ्या प्रमाणावर बेटिंग घेणार्या 6 सट्टेबाजांच्या पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेतील अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाने मुसक्या आवळल्या आहेत. त्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्यासह एकुण 9 जणांविरूघ्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी फ्लॅटमधील 13 मोबाईल, 2 लॅपटॉपसह इतर ऐवज असा एकुण 4 लाख 81 हजार 200 रूपयाचा माल जप्त केला आहे.
वैभव बाबराम डिक्कर (28, मुळ रा. बजरंगबली मंदिराजवळ, रामटेकपुरा, वॉर्ड नं. 16, अकोट, ता. अकोट, जि. अकोला), सचिन गंगाराम आजगे (23, मुळ रा. वसमाल, ता. साकरी, जि. धुळे), विकास कैलास लेंढे (22, रा. राहु पिंपळगांव, पो. कोरेगाव, ता. दौंड, जि. पुणे), ओमकार बिरा भांड (20, रा. राहु पिंपळगांव, पो. कोरेगाव, ता. दौंड, जि. पुणे), आशिष निरांजण देशमुख (28, रा. मु. कोळीवेडी, ता. अकोट, जि. अकोला) आणि महेश परमेश्वर काळे (33, रा. फ्लॅट नंबर 1, जी-विंग, बिर्ला गेट, अकोला) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांचे साथीदार तसेच म्होरके राम भानु शाली, विकास रायसिंग चव्हाण आणि प्रकाश भगवानदास तेजवाणी हे फरार आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेतील एएचटीयुचे पोलिस अधिकारी व पोलिस अंमलदार हिंजवडी पोलिस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी त्यांना लक्ष्मी चौक ते मारूंजी रोडवरील कोलते पाटील प्रोजेक्टच्या जी बिल्डींगमधील 14 व्या मजल्यावरील फ्लॅट नंबर 1405 मध्ये काहीजण आयपीएल क्रिकेट मॅचवर मोठया प्रमाणावर बेटिंग घेत असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीची खातरजमा करण्यात आली. त्याबाबत वरिष्ठ पोलिस अधिकार्यांना कळविण्यात आले.
वरिष्ठ पोलिस अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली एएचटीयुच्या पथकाने फ्लॅटवर छापा टाकला असता तेथे वैभव बाबाराम डिक्कर आणि इतर जण हे मोबाईल आणि लॅपटॉपच्या मदतीने लखनौ सुपर जॉइंट विरूध्द कोलकत्ता नाईट राईडर्समध्ये सुरू असलेल्या मॅचवर ऑनलाइन पध्दतीने वेगवेगळया बेवसाईटवर आयडीव्दारे ऑनलाइन क्रिकेट व इतर सट्टा खेळव खेळवित असल्याचे आढळून आले. पोलिसांनी पथकाने त्यांना तात्काळ ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडून 90 हजार रूपये किंमतीचे 2 लॅपटॉप, 3 लाख 90 हजार रूपये किंमतीचे 13 मोबाईल फोन, एक वायफाय आणि 4 नोटबुक असा एकुण 4 लाख 81 हजार 200 रूपयाचा ऐवज जप्त केला आहे. पोलिस फरार आरोपी आणि अटक केलेल्यांचे म्होरक्यांचा शोध घेत आहेत.
पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अप्पर पोलिस आयुक्त वसंत परदेशी, पोलिस उपायुक्त स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली एएचटीयुचे पोलिस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक प्रदिपसिंग सिसोदे, पोलिस उपनिरीक्षक विजय कांबळे, पोलिस अंमलदार सुनिल शिरसाठ, पोलिस अंमलदार गणेश कारोटे, महिला पोलिस वैष्णवी गावडे आणि टीएडब्ल्यूचे पोलिस अंमलदार नागेश माळी यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.