पुणे : शहरातील गुन्हेगारी स्वरूपाच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का कायद्यानुसार कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. आज पर्यंत त्यांनी साठ टोळ्यांना मोक्का लावून तुरुंगात धाडले आहे. तर उत्तम नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत निर्माण करणाऱ्या निलेश गायकवाड आणि त्याच्या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करून मागील एक वर्षात शहरात 61 मोक्का कारवाया केल्या आहेत.
टोळी प्रमुख निलेश विजय गायकवाड, अक्षय रवींद्र खवळे, ऋतिक कैलास एखंडे, विकी उर्फ हेमंत धर्मा काळे, मोन्या उर्फ रामेश्वर सुभाष मोरे, कार्तिक संजय इंगवले, अनिरुद्ध उर्फ बाळा राजू जाधव, अक्षय उर्फ अवधूत महेश यादव, अरविंद मारुती माडकर, संकेत राजेंद्र ढेणे आणि विकास कैलास गायकवाड अशी टोळीतील गुन्हेगारांची नावे आहेत.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, या टोळीने गणपती माथा वारजे परिसरातील केदार भालशंकर याच्यावर गोळीबार करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी उत्तम नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. दरम्यान यातील आरोपींवर वारंवार कारवाई करूनही त्यांच्या वर्तनात सुधारणा होत नसल्याचे लक्षात आले.
दरम्यान या टोळीतील सदस्यांची गुन्हेगारी स्वरूपाची पार्श्वभूमी पाहून त्यांच्याविरोधात मोक्का नुसार कारवाई करण्याचा प्रस्ताव तयार करून तो वरिष्ठ अधिकार्यांकडे पाठविण्यात आला होता. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रस्तावाची छाननी करून कारवाई करण्यास मंजुरी दिली.