जिल्हा वार्षिक योजनेसाठी ६८० कोटींच्या आराखड्यास मंजुरी
पुणे जिल्हा वार्षिक योजनेच्या आराखड्यात १५९.२२ कोटींची वाढ
पुणे : जिल्हा वार्षिक योजनेच्या ६८० कोटी रुपयांच्या सर्वसाधारण प्रारुप आराखड्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंजुरी दिली. जिल्हा वार्षिक योजनेच्या आराखड्यासाठी ५२०.७८ कोटींची मर्यादा ठरवून देण्यात आली होती, त्यात १५९.२२ कोटींची वाढ करून आराखडा मंजूर करण्यात आला. या योजनेच्या निधीतून दर्जेदार कामे करावीत. तसेच, ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यावर भर द्यावा, अशा सूचना पवार यांनी दिल्या.
पुण्यातील विधानभवन सभागृहात उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (ता. १२) राज्यस्तरीय बैठक घेण्यात आली. पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यांचा २०२१-२२ चा सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनांचा प्रारुप आराखडा अंतिम करण्यात आला.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, जिल्हा वार्षिक योजनेचा निधी खर्च करुन उत्कृष्ट काम करणाऱ्या प्रत्येक महसूल विभागातील उत्कृष्ट जिल्ह्याला ५० कोटींचा अतिरिक्त निधी “आव्हान निधी” म्हणून देण्यात येईल. यासाठी निकष ठरवण्यात येणार असून त्यात आय-पास प्रणालीचा शंभर टक्के वापर करणे, जिल्हा नियोजन समितीच्या वेळेत बैठका घेणे, प्रशासकीय मान्यता वेळेत देणे, अखर्चित निधी कमीत कमी ठेवणे, नाविन्यपूर्ण योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे या बाबींचा आढावा विभागीय आयुक्त घेतील. यातून उत्कृष्ट जिल्ह्याची निवड करुन या जिल्ह्याला ५० कोटींचा “आव्हान निधी” देण्यात येईल. या निधीतून गतीने कामे करताना कामांचा दर्जा चांगला ठेवा. शाळांच्या इमारतींचे बांधकाम, पाझर तलाव बांधकाम, पाणंद रस्त्यांची कामे उत्तम दर्जाची करावीत.
विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे म्हणाल्या, जिल्ह्यात अष्टविनायकाची तीर्थक्षेत्रे आहेत. या तीर्थक्षेत्रांच्या मार्गावरील रस्त्यांची कामे होणे आवश्यक आहे. तसेच मुख्य रस्त्यांची कामे करताना स्वछतागृहांचे बांधकाम होणे गरजेचे आहे, यादृष्टीने संबंधित विभागांनी दक्षता घ्यावी.
या बैठकीस राज्यमंत्री शंभूराज देसाई, दत्तात्रेय भरणे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, आमदार मुक्ता टिळक, सुनील शेळके, सुनील टिंगरे, दिलीप मोहिते, अतुल बेनके, अशोक पवार, अतिरिक्त मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख या वेळी उपस्थित होते.