लोणावळा : थंड हवेचे ठिकाण असणाऱ्या लोणावळा शहरात एका डाॅक्टरांच्या घरावर गुरुवारी सशस्त्र दरोडा पडला आहे. दरोडेखोरांनी 67 लाखांचा ऐवज लंपास केला आहे. या दरोड्यातील आरोपींच्या शोधार्थ पोलिसांची सात पथके विविध भागात रवाना केली असल्याची माहिती पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक डाॅ. अभिनव देशमुख यांनी दिली.
गुरुवारी रात्री 2 ते 3 च्या सुमारास लोणावळा प्रधानपार्क सोसायटीमधील बालरोगतज्ज्ञ डाॅ. हिरालाल खंडेलवाल यांच्या घरावर सशस्त्र दरोडा पडला होता. त्यामध्ये सुमारे 50 लाख रुपये रोख व 17 लाख रुपयांचे सोनं असा ऐवज लंपास केला होता. हे सर्वजण 22 ते 25 वयोगटातील युवक असून हिंदी भाषा व अन्य एका भाषेमध्ये बोलत होते.
प्रधानपार्क येथील बंगल्यातील सिसीटिव्ही तसेच पोलीसांनी लावलेल्या सिसीटिव्ही मध्ये हे आरोपी कैद झाले आहेत. त्यांचा सविस्तर येण्या जाण्याचा मार्ग देखील पडताळण्यात आला आहे. लवकरच आरोपी देखील पकडले जातील असा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे.
दरम्यान आज कोल्हापुर विभागाचे पोलीस महासंचालक मनोजकुमार लोहिया यांनी पोलीस अधिक्षक डाॅ. अभिनव देशमुख, अपर पोलीस अधिक्षक विवेक पाटील, सहायक पोलीस अधिक्षक नवनित काँवत, एलसीबीचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्याकडून घटनेचा आढावा घेतला आहे.