दिल्ली : पंधरा वर्षांवरील व्यावसायिक वाहन थेट भंगारात काढण्याच्या केंद्र शासनाच्या निर्णयामुळे पहिल्या वर्षांत देशातील सुमारे ७० लाख, तर महाराष्ट्रात एक लाखाहून अधिक वाहने भंगारात निघणार आहेत. एप्रिल २०२२ पासून हा निर्णय लागू होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
व्यावसायिक वाहनांच्या वयोमर्यादेबाबत केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी सुरुवातीला स्पष्टीकरण दिले होते. १५ वर्षांपेक्षा अधिक आयुर्मान असलेली वाहने भंगारात काढण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला होता. त्यापाठोपाठ केंद्रीय अर्थसंकल्पातही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वाहनांच्या वयोमर्यादेच्या विषयाला मंजुरी दिली.
या निर्णयाला वाहतूकदारांकडून विरोध सुरू झाला आहे. निर्णय लागू झाला, तर वाहतूकदारांचे मोठे नुकसान होणार असल्याने देश आणि राज्य पातळीवर त्याबाबतचा आढावाही घेण्यात आला आहे. त्यानुसार पहिल्याच वर्षांत देशात ७० ते ८० लाख वाहने भंगारात निघतील, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे.