तब्बल 35 लाख रुपयांचे 70 तोळे सोन्याचे दागिने; 8 लाख रुपयांची रोकड जप्त

हिंजवडी पोलिसांची गुजरात राज्यात जाऊन मोठी कामगिरी

0

पिंपरी : बंद घरांची रेकी करुन, घरफोडी करुन, लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने एजंट मार्फत परराज्यात विक्री करणाऱ्या टोळीला हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून सुमारे 35 लाख रुपये किंमतीचे 70 तोळे सोने व 8 लाख रोख रक्कम असा ऐवज हस्तगत केला आहे. विशेष म्हणजे यातील मुख्य आरोपीवर पिंपरी-चिंचवड आणि मावळ पोलीस ठाण्यात चोरीचे 48 गुन्हे दाखल असून पैकी 29 गुन्हे पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील पोलीस ठाण्यात दाखल आहेत.

अजय सर्जा नानावत (27, रा.मुळशी) कन्हैया विजय राठोड (19, रा. मावळ), आशा राजूभाई ठक्कर (रा. गुजराथ) यांना अटक केली असून अनिरुद्ध योगेश राठोड उर्फ नानावत व त्यांचे इतर दोन साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल असून ते फरार आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोपट चांदेरे (रा. सुसगाव) यांनी 25 डिसेंबर रोजी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार 23 ते 24 डिसेंबर दरम्यान घरफोडी करून चोरट्यांनी घरातील 119 तोळे सोने व रोख रक्कम चोरून नेली होती. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली व परिसरातील 57 पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहिले.

तपास करत असताना सहायक पोलीस निरीक्षक सागर काटे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सुसगाव घरफोडीतील संशयीत हा दुचाकीवरून बापुजी मंदीर येथे येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले.

चौकशीत त्याने त्याचे नाव अजय सांगितले. त्याने गुन्हा कबुल केला व सांगितले की तो स्वतः दिवसा घरांची रेकी करत असे व त्याचे साथीदार कन्हैया, मोहन, अनिरुद्ध यांच्या मदतीने घरफोडी करत असे. चोरी केलेला माल आरोपी अहमदाबाद येथील आशा ठक्कर ला विकला त्याचे 8 लाख रुपये बँक खात्यात जमा केले.

तपास तेथेच न थांबवता हिंजवडी पोलिसांची एक टीम गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान येथे जाऊन सलग 15 दिवस राहिली. ठक्कर ही पुण्यात येणार अशी माहिती मिळताच पोलिसांनी तीला पुण्यातून ताब्यात घेतले. तिच्याकडून पोलिसांनी तपासात 66 तोळे सोने जप्त केले. अशा प्रकारे पोलिसांनी या तपासात अजय कडून 4 तोळे सोने व 8 लाख रुपये व ठक्कर कडून 66 तोळे सोन असे एकूण 70 तोळे सोने व 8 लाख रुपये ऐवज जप्त केला.

आरोपी अजय नानावत याच्यावर यापुर्वीही एकूण 48 गुन्हे दाखल असल्याचे तर ठक्कर वर 6 गुन्हे दाखल असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त मनोज लोहिया, अप्पर पोलीस आयुक्त संजय शिंदे, उपायुक्त काकासाहेब डोळे, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले यांच्या मार्गदर्शनाखाली हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, पोलीस निरीक्षक गुन्हे सुनिल दहिफळे, सोन्याबापु देशमुख, सहायक पोलीस निरीक्षक सागर काटे, राम गोमारे, पोलीस उपनिरीक्षक अजीत पाटील, पोलीस अंमलदार बंडू मारणे, बाळकृष्ण शिंदे, योगेश शिंदे, कुणाल शिंदे, बापुसाहेब धुमाळ, कैलास केंगले, विक्रम कुदळ, अरुण नरळे, रितेश कोळी, श्रीकांत चव्हाण, चंद्रकांत गडदे, कारभारी पालवे, दत्ता शिंदे, अमर राणे, ओमप्रकाश कांबळे, सागर पंडित , सुभाष गुरव, सोनाली ढोणे, ऋती सोनावणे, शालीनी वचकल यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.