पुणे : भाडे तत्त्वावर घेतलेल्या ७७ कारचा अपहार करीत त्या दारुच्या वाहतुकीसाठी वापरण्यात आल्या आहेत. येरवडा पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात पोलिसांनी केलेल्या तपासातून ही बाब स्पष्ट झाली आहे. त्यातील ४६ कार पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
या प्रकरणात एकाचा जामीन अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी. पी. आगरवाल यांनी फेटाळला. अयान ऊर्फ राहुल ऊर्फ ऍन्थोनी पॉल छेत्तीयार (वय ३८, रा.मुंबई) असे जामीन फेटाळलेल्याचे नाव आहे. टुर्स अँड ट्रॅव्हल्स व्यवसायिक श्रीधर जगताप यांनी याबाबत येरवडा पोलिसात फिर्याद दिली आहे.
या गुन्ह्यात छेत्तीयार याच्यासह आशिष गंगाराम पुजारी, (वय ३२), सत्यप्रकाश मिठार्इलाल वर्मा (वय ३०), मोहमंद वसीम मोहम्मद फरीद शेख (वय ३३) आणि जावेद अब्दुससत्तार शेख (वय ४६) यांना अटक करण्यात आली आहे. फिर्यादींकडून २४ जून रोजी इनोव्हा कार या प्रकरणात गुन्हा दाखल असलेल्या एका व्यक्तीने नेली. करारात ठरल्याप्रमाणे सरकारी अधिकाऱ्याला गाडी भाड्याने देणे अपेक्षित होते. मात्र गाडीचा वापर दारूच्या वाहतुकीसाठी करण्यात आला.
तसेच भाडे आणि गाडी परत करण्यात आली नाही. त्यामुळे तक्रार दिल्यानंतर आरोपींना अटक करण्यात आली होती. या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या छेत्तीयार याने जामिनासाठी अर्ज केला. यास अतिरिक्त सरकारी वकील लीना पाठक यांनी विरोध केला. या गुन्ह्यातील आरोपींकडून तब्बल ७७ गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. त्याच्यावर नेरूळ आणि ओशिवारा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे.
आरोपींचे मोठे रॅकेट असण्याची शक्यता आहे. जामीन मिळाल्यास तो पुन्हा अशा प्रकारचे गुन्हा करण्याची, पुराव्यामध्ये ढवळाढवळ करण्याची अथवा परागंदा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याचा जामीन फेटाळण्याची मागणी ॲड. पाठक यांनी केली. येरवडा पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक समीर करपे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.