पिंपरी : ज्येष्ठ नागरिकास योनो बॅंक ऍप डाउनलोड करण्यास सांगून तब्बल 10 लाख 10 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. मात्र सांगवी पोलिसांनी तांत्रीक तपास करत 8 लाख रुपये परत मिळवून देत चांगली कामगिरी केली आहे.
फिर्यादी सुषमा जावळे यांना अनोळखी मोबाईल फोन वरून फेक कॉल करून तुमचे लाईट बिल थकले असून ते न भरल्यास आपली लाईट कट करण्यात अईल असे सांगण्यात आले. तसेच योनो बँक थर्ड पार्टी ऍप डाउनलोड करण्यास सांगितले. फिर्यादी या ज्येष्ठ नागरिक असल्यामुळे त्यांनी आरोपीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून आरोपी सांगेल त्या प्रमाणे पुर्ण माहिती दिली. त्या आरोपीच्या म्हणण्याप्रमाणे प्रक्रिया केल्याने फिर्यादीच्या अकाउंट वरून 10,10,920 रुपये फ्रॉड करून स्वतःच्या अकाउंट वर ट्रान्सफर करून घेऊन फिर्यादीची फसवणूक केली. त्याबाबत सांगवी पोलीस ठाण्यात भा. द. वि. कलम 420 माहिती तंत्रज्ञान 2008 चे कलम 66 सी अन्वये 6 जुलैला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल टोणपे, पोलीस निरीक्षक गुन्हे सुनिल तांबे यांनी पोलीस नाईक नूतन कोंडे व पोलीस नाईक प्रवीण पाटील यांना तपासाबाबत सुचना दिल्या व फसवणूक झालेली रकम रिकव्हर करणेबाबत व आरोपींचा शोध घेणेबाबत सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे त्यांनी बँकेतून झालेल्या व्यवहारांची माहिती घेउन त्या अनुषंगाने ऑनलाईन व्यवहार झालेल्या बँकेशी संपर्क साधला. त्यामुळे आरोपीचे अकाउंट तात्काळ फ्रिज करून फिर्यादी महिलेचे फसवणूक झालेल्या 10,10,920 पैकी 8 लाख रुपये फिर्यादीच्या बँक खात्यात जमा करून घेण्यात आले.
ही कारवाई आयुक्त अंकुश शिंदे, अपर पोलीस आयुक्त डॉ संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ 2 आनंद भोईटे, सहाय्यक पोलीस आयुक्त वाकड विभाग श्रीकांत दिसले यांच्या मार्गदर्शनाखाली सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल टोणपे, पोलीस निरीक्षक गुन्हे सुनिल तांबे व त्यांच्या पथकाने कारवाई केली आहे.