पुणे : राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान झाल्याने मंगळवारपर्यंत (ता. १३) वादळी वारे, मेघगर्जना, विजांसह पाऊस आणि गारपीट होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
देशभरात मार्च ते मे या तीन महिन्यांच्या कालावधीत पडणारा पाऊस पूर्वमोसमी समजला जातो. पूर्व उत्तरप्रदेश, बिहार परिसरावर चक्राकार वारे वाहत आहेत. विदर्भापासून तामिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा (द्रोणीय स्थिती) सक्रीय आहे. पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे बंगालच्या उपसागरातुन बाष्पाच्या पुरवठा होत आहे. परिणामी पुढील पाच दिवस विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाच्या काही भागात मेघगर्जना, वीजा, वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार आहे. तर विदर्भात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची अंदाज आहे.
राज्यात दोन-तीन दिवसांपासून ढगाळ हवामान होत आहे. उन्हाच्या चटक्याबरोबरच उकाड्यात वाढ झाली आहे. पुढील चार ते पाच दिवस वादळी पावसाचे सावट असल्याने, ढगाळ हवामान राहून, कमाल तापामानात २ ते चार अंशांची घट होण्याची शक्यता आहे. शक्रवारी (ता. ९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील चंद्रपूर येथे देशभरातील सर्वोच्च ४३.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
राज्यातील प्रमुख शहरांमध्ये शक्रवारी (ता. ९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदवले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३४.२, जळगाव ४१.०, कोल्हापूर ३६.७, महाबळेश्वर ३०.१, मालेगाव ४०.२, नाशिक ३७.३, सांगली ३७.१, सातारा ३८.०, सोलापूर ३४.६, मुंबई (कुलाबा) ३२.६, सांताक्रूझ ३२.६, अलिबाग ३३.३, डहाणू ३३.०, रत्नागिरी ३२.९, ठाणे ३४.६, औरंगाबाद ३९.०, परभणी ३६.०, नांदेड ३३.०, अकोला ४२.०, अमरावती ४१.२, बुलढाणा ३९.४, ब्रह्मपूरी ४३.२, चंद्रपूर ४३.४, गोंदिया ४०.०, नागपूर ४१.३, वर्धा ४२.५, यवतमाळ ४२.५.