पिंपरी : कोरोनाच्या दुस – या लाटेमध्ये पिंपरी चिंचवड शहरात रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे . मागील दहा दिवसांपासून रोज अडीच हजारांहून जास्त रुग्ण बाधित होत आहेत . तर आजपर्यंत 25326 सक्रिय रुग्णांची संख्या असून मनपाच्या विविध रुग्णालयांत 4671 रुग्ण उपचारांसाठी दाखल आहेत . मनपाचे सर्व रुग्णालय पुर्ण क्षमतेने भरलेले असून वायसीएम हॉस्पिटलमध्ये मोकळ्या जागेत मंडप टाकून रुग्णांवर उपचार सुरु आहेत . एकंदरीतच हि परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची लक्षण आहेत . त्यामुळे अत्यावश्यक आणि तातडीचीबाब म्हणून माननीय आयुक्तांनी आपल्या अधिकारात भोसरी गावजत्रा मैदान येथे दुसरे जम्बो कोविड रुग्णालय उभारावे अशी मागणी पिंपरी चिंचवड मनपा स्थायी समितीचे अध्यक्ष अॅड . नितीन लांडगे यांनी आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे .
भोसरी गावजत्रा मैदानात जम्बो कोविड रुग्णालय पिंपरी चिंचवड शहर हे कामगार नगरी म्हणून ओळखले जाते . शहरालगत असणा – या ग्रामिण भागातील हजारो नागरीक सेवा सुविधांसाठी पिंपरी चिंचवड मनपावर अवलंबून असतात . भोसरी , पिंपरीतील औद्योगिक परिसरातील बहुतांशी कामगार वर्ग उपचारासाठी भोसरीतील रुग्णालय आणि वायसीएम रुग्णालयावर अवलंबून असतात . फेब्रुवारी महिण्यापासून कोरोनाच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत असून मृत्यूचे प्रमाण देखिल चिंता वाढविणारे आहे . पिंपरी चिंचवड मनपाचे सर्व रुग्णालय आणि ऑटो क्लस्टर तसेच आण्णासाहेब मगर स्टेडीयम येथिल जम्बो कोविड हॉस्पिटलमध्ये आज अत्यवस्थ रुग्णांना देखिल बेड उपलब्ध होत नाहीत . पर्यायाने रुग्णांना महागड्या खाजगी रुग्णालयात दाखल व्हावे लागत आहे . खाजगी रुग्णालयात नागरीकांची आर्थिक पिळवणूक होत आहे . अवाजवी बिलांची आकारणी केली जात आहे .
हि भयावह परिस्थिती हाताबाहेर जाण्याअगोदर माननीय आयुक्तांनी अतिअत्यावश्यक व तातडीची गरज म्हणून भोसरी गावजत्रा मैदानात दुसरे जम्बो कोविड रुग्णालय उभारावे . याबाबतची पुढील कार्यवाही मा . आयुक्तांनी ताबडतोब करावी अशीही मागणी स्थायी समिती अध्यक्ष अॅड . नितीन लांडगे यांनी केली आहे .