पुणे : जस्ट डायलने दिलेल्या नंबरवर फोन केल्यानंतर समोरील व्यक्तीने बँक खात्याची माहिती घेत आठ हजार रुपयांना आँनालार्इन पद्धतीने गंडा घातला. त्यामुळे ही रक्कम फसवणूक झालेल्या व्यक्तीस व्याजासह परत करण्याचे आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दिला आहे.
आदेश आयोगाचे अध्यक्ष उमेश जावळीकर, सदस्य संगीता देशमुख आणि क्षितिजा कुलकर्णी यांनी दिला आहे. या बरोबरच तक्रारदारांना मानसिक व शारीरिक त्रास आणि तक्रार खर्चापोटी २० हजार रुपये देण्यात यावेत, असेही आदेशात नमूद आहे.
याबाबत गजानन दत्तात्रेय एकबोटे (रा. दांडेकर पूल) यांनी जस्ट डायल कंपनी लिमिटेड विरोधात आयोगात तक्रार दिली होती. तक्रारदार यांनी २८ सप्टेंबर २०२० रोजी जस्ट डायलच्या ८८८८८ ८८८८८ या क्रमांकावर फोन करून रिक्षा चालविण्यासाठी ओला कंपनीचा नंबर व माहिती मागवली. त्यानंतर लगेचच त्यांच्या व्हॉटअपवर ओला कंपनीची माहिती आणि मोबाइल नंबर आला. त्या नंबरवर तक्रारदार यांनी फोन केला. त्यावेळी समोरील व्यक्तीने त्यांच्याकडून बँक खात्याची माहिती घेतली. त्यानंतर आलेला ओटीपी त्यांना संबंधित व्यक्तीला पाठवला. ओटीपी सांगितल्यानंतर काही वेळातच तक्रारदार यांच्या खात्यातून सुरुवातील पाच व नंतर तीन असे आठ हजार रुपये वजा झाले.
जस्ट डायलने दिलेल्या नंबरवर फोन केल्याने व त्यांना पुरविलेल्या माहितीमुळे आठ हजार रुपये बँक खात्यातून कमी झाल्याने नुकसान भरपार्इ मिळावी म्हणून तक्रारदारांनी आयोगात तक्रार दाखल केली होती. याबाबत नोटीस मिळाल्यानंतरही जस्ट डायलकडून कोणी आयोगात हजर झाले नाही. त्यामुळे एकतर्फी आदेश देण्यात आला.