पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या माध्यमिक शिक्षण विभागाने खरेदी केलेल्या शालेय वह्या व पुस्तकांचा पुरवठा न करताच कोट्यवधींचे बिले उकळण्यात आली असून या ठेकेदारांवर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी , अशी मागणी राष्ट्रवादीचे नगरसेवक तथा शिक्षण समितीचे सदस्य मोरेश्वर भोंडवे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे . या मागणीचे निवेदन मोरेश्वर भोंडवे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही पाठविले आहे .
भोंडवे यांनी दिलेल्या पत्रात अतिशय गंभीर आक्षेप नोंदविले आहेत . या पत्रात म्हटले आहे की , शिक्षण मंडळाच्या माध्यमिक शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी शालेय पुस्तके व वह्यांची खरेदी करण्यात आली आहे . थेट पद्धतीने करण्यात आलेल्या खरेदीसाठी ठेकेदारांना आदेश देण्यात आला होता . मात्र संबंधित ठेकेदाराने साहित्य न पुरविताच पुरवठा केल्याची चलने माध्यमिक विभागाकडे सादर केली आहेत .
या चलनाच्या आधारे संबंधितांना पन्नास टक्के बिल हे ३१ मार्च रोजीच अदा करण्यात आलेले आहे . साहित्य न पुरविता ठेकेदाराने महापालिकेकडून पैसे उकळून महापालिकेची फसवणूक केली आहे . हा प्रकार अत्यंत गंभीर असून यातून ठेकेदाराची मनमानी दिसून येत आहे . या संपूर्ण प्रकरणाची तात्काळ चौकशी करावी तसेच ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा व लेखी खुलासा शिक्षण समितीसमोर सादर करावा , अशी मागणीही मोरेश्वर भोंडवे यांनी या पत्राद्वारे केली आहे .