पुणे : पुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा आणखी काळाबाजार पोलीसांनी उघडकीस आणला असून, नर्सिंग होममधील एका कर्मचाऱ्याला अटक केली आहे. त्याच्याकडून दोन इंजेक्शन जप्त करण्यात आले आहेत. तर आणखी काही आरोपी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शिवाजी हनुमंत सावंत (24, रा. खरातवाडी, पंढरपूर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी रेमडेसिवीर इंजेक्शनला मागणी वाढली आहे. काळ्याबाजारात जादा दराने इंजेक्शनची विक्री केली जात आहे. काही दिवसांपूर्वी एका महिलेसह दोघांना पकडले होते. त्यामुळे याची माहिती काढली जात आहे. हा काळा बाजार थांबविण्यासाठी 10 पथके तयार करण्यात आली आहेत.
यावेळी गुन्हे शाखेच्या युनिट तीनला भवानी पेठेत एकजण रेमडेसिवीर इंजेक्शन विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. यानुसार येथे सापळा कारवाई करून सावंत याला पकडले. त्याच्याकडून दोन इंजेक्शन आणि रोकड असा 26 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अधिक माहितीत तो शिंदे नर्सिंग होम येथे असिस्टंट म्हणून काम करत होता. येथे दाखल असणाऱ्या एका महिलेसाठी डॉक्टरांनी 6 इंजेक्शन आवश्यक असल्याचे चिठ्ठी दिली होती. त्यावेळी त्याने 6 ऐवजी 8 इंजेक्शन मागितले. त्यातले दोन इंजेक्शन ठेवून घेत त्याची 7 हजार रुपयांना विक्री करणार होता, असे तपासात उघडकीस आले आहे.
पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट तीनचे वरिष्ठ निरीक्षक अनिल शेवाळे, सहाय्यक निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी, उपनिरीक्षक गुंगा जगताप, दत्तात्रय काळे, रामदास गोणते, सचिन गायकवाड, विल्सन डिसोझा यांनी ही कारवाई केली