पुणे जिल्ह्यातील लसींचा कोटा वाढवून मिळावा : लक्ष्मण जगताप

0

पिंपरी : कोरोना रुग्णांची दररोज झपाट्याने होणारी वाढ लक्षात घेता पुणे जिल्ह्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसींचा कोटा वाढवून मिळावा . तसेच पुणे जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या रुग्णालयांना केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या व्हेंटिलेटरचा वेळेत पुरवठा करण्यात यावा , अशी मागणी आमदार लक्ष्मण जगताप यांनी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे केली आहे . यासंदर्भात आमदार लक्ष्मण जगताप यांनी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना ईमेल केलेल्या निवेदनात म्हटले आहे , ” महाराष्ट्रात दररोज कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे . त्यातही पुणे जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येत दररोज सर्वाधिक वाढ होत आहे .

जिल्ह्यासह पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही शहरातील कोरोना रुग्णांची वाढणारी संख्या चिंताजनक आहे . या दोन्ही शहर कोरोना चाचण्यांचे प्रमाण आणखी वाढवण्याची आवश्यकता आहे . त्याचबरोबरच दोन्ही महापालिकांच्या मार्फत कोरोना लसीकरण मोहीमही व्यापक करण्याची गरज आहे . पुणे आणि पिंपरी – चिंचवड या दोन्ही शहरात सर्व वस्त्या व गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये कोरोना लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात राबविण्यासाठी मुबलक प्रमाणात लस उपलब्ध होणे अत्यंत गरजेचे आहे .

त्याचप्रमाणे पुणे जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांना लसीकरणासाठी प्रवृत्त करण्याची आवश्यकता आहे . परंतु , लोकसंख्येच्या तुलनेत मिळणाऱ्या लसीचे प्रमाण कमी आहे . त्यामुळे कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता केंद्र सरकारकडून पुणे जिल्ह्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसींचा कोटा वाढवून मिळावा . त्याबाबत आपण संबंधित यंत्रणांना आदेश द्यावेत .

तसेच पुणे जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या रूग्णालयांना केंद्र सरकारकडून देण्यात येणाऱ्या व्हेंटीलेटरचा वेळेत पुरवठा व्हावा यासाठी संबंधित यंत्रणेला आपण आदेश द्यावेत , अशी मागणी त्यांनी केली आहे . ”

Leave A Reply

Your email address will not be published.