पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात कोरोना रूग्ण संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असताना महानगरपालिकेच्या वतीने आवश्यक सर्व वैद्यकिय /आरोग्य सुविधा पुरवण्यात मनपा प्रशासन चांगल्या पद्धतीने कार्यरत आहे. कोव्हीड रूग्णाच्या संख्येत वाढ होत असतांनाच मनपाच्या मध्यवर्ती भांडार विभागाच्या वतीने कोरोना काळात अनावश्यक खरेदीच्या निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. मागील मे महिन्यात सुद्धा शालेय साहित्याच्या नावावर बालवर्गासाठी टेबल खुर्च्या यांची खरेदी करून पुरवठ्याचे आदेश देऊन पुरवठा दाराचे बिल अदा करण्याचा गंभीर प्रकार मध्यवर्ती भांडार विभागाच्या वतीने करण्यात आला होता.
आता भांडार विभागाच्या वतीने मोरवाडी औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या तारतंत्री व विजतंत्री विभागाच्या करीता आवश्यक टुल किटस, इक्किपमेंट, मशिनरी साहित्यचा पुरवठा करून टर्न की प्रोजेक्ट कार्यान्वित करून देण्याकरीता कोट्यावधी रुपयांच्या दोन निविदा काढुन निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे . कोरोना परिस्थिती मागील वर्षी पासुन सर्व शिक्षण संस्था, औद्योगिक व्यवसायिक शिक्षण संस्था, विविध विभाग बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे किंवा ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देण्याचे आदेश देण्यात आले आहे.
गेल्या वर्षीपासुन औद्योगिक प्रशिक्षण संस्था बंद असताना तसेच सध्याचा कोरोना व्हायरसचा पादुर्भाव पाहता विद्यार्थीच्या उपस्थितीत औद्योगिक प्रशिक्षण संस्था चालु होईल यात शंका निर्माण होत असतानाच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मध्यवर्ती भांडार विभागाच्या वतीने पालिकेच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था विजतंत्री ( विभाग अ व ब ) या व्यवसायाकरीता आवश्यक टुल किटस, इक्किपमेंट, मशिनरी साहित्यचा पुरवठा करून टर्न की प्रोजेक्ट कार्यान्वित करून घेणेकामी इच्छुक उत्पादित कंपनी अथवा पुरवठाधारक यांच्या कडुन मागविण्याकरीता ई निविदा सूचना क्रमांक ४६ / २०२०-२१ नुसार ६,४२,७७,२७२ रूपयांची निविदा प्रसिद्ध करून दि.२२.०१.२०२१ ते ११.०२.२०२१ या काळात प्रक्रिया राबविण्यात आली.
तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्था तारतंत्री विभाग या व्यवसायाकरीता आवश्यक टुल किटस, इक्किपमेंट, मशिनरी साहित्यचा पुरवठा करून टर्न की प्रोजेक्ट कार्यान्वित कार्यान्वित करून घेणेकामी इच्छुक उत्पादित कंपनी अथवा पुरवठाधारक यांच्या कडुन मागविण्याकरीता ई निविदा सूचना क्रमांक ५४ / २०२०-२१ नुसार २,०१,७७,४२२ रूपयांची निविदा प्रसिद्ध करून दि.१०.०३.२०२१ ते २६.०३.२०२१ या काळात प्रक्रिया राबविण्यात आली.
औद्योगिक प्रशिक्षण संस्था मोरवाडी येथील प्रशिक्षण घेणा-या प्रशिक्षणार्थी यांच्या अभ्यासक्रमाकरीता विविध साहित्य खरेदीस आमचा विरोध नसुन कोरोना व्हायरसच्या संकटात गेल्या १ वर्षापासून सर्व शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था बंद असताना तसेच सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता अजुनही या संस्था कधी चालु होतील हे माहित नसतानासुद्धा मध्यवर्ती भांडार विभागाच्या वतीने कोट्यावधी रुपयांच्या खरेदीच्या निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. थोडक्यात काय तर आज मनपा प्रशासन नागरीकांच्या आरोग्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करून वैद्यकीय सुविधा पुरवत शहराची परिस्थिती सुधारण्यासाठी कार्यरत असताना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा एक भाग असणारा मध्यवर्ती भांडार विभागाच अनावश्यक खरेदीच्या माध्यमातून ठेकेदार पोसण्याचे काम करून नागरीकांच्या पैशाचा अपव्यय करीत आहे.
आज नागरीक व मनपा प्रशासन कोव्हीड मध्ये त्रासलेला असताना निविदा प्रक्रिया राबवून खरेदी / पुरवठ्याचे आदेश देऊन बिल अदा करण्याचा गंभीर प्रकार मागील वर्षी पण भंडार विभाग ( बालवर्गासाठी खरेदी केलेल्या टेबल खुर्च्या) यांनी केला होता विशेष म्हणजे साहित्य पुरवठा / खरेदी न करता ठेकेदाराला बिल अदा केले होते पण सदर प्रकार उघडकीस आल्याने साहित्य पुरवठा करावा लागला. थोडक्या देत काय तर अशा प्रकारच्या परिस्थिती निविदा प्रक्रिया राबवून खरेदी न करता ही ठेकेदाराला मालामाल करून नागरीकांच्या कररूपी पैशावर डल्ला मारण्याचा चुकीचा प्रकार मध्यवर्ती भांडार विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.
तरी आयुक्तांनी कोरोना संकटकाळी औद्योगिक प्रशिक्षण संस्था बंद असतानासुद्धा तारतंत्री व विजतंत्री व्यवसायाकरीता आवश्यक टुल किटस इक्किपमेंट मशिनरी साहित्यचा पुरवठा करण्याची काढण्यात आलेल्या कोट्यावधी रूपयांच्या निविदा रद्द करून नागरीकांच्या वैद्यकीय व आरोग्य सुविधावर खर्च करण्यात यावा अशी मागणी राहुल रूपराव कोल्हटकर यांनी केेेेली आहे.