ऑक्सिजन तयार करणाऱ्या कंपन्यांवर शासनाने नियंत्रण ठेवावे

0

पिंपरी : भविष्यातील ऑक्सिजनचा काळाबाजार आणि तुटवडा रोखण्यासाठी ऑक्सिजन तयार करणाऱ्या कंपन्यांवर शासनाने नियंत्रण ठेवावे अशी मागणी नगरसेवक तुषार कामठे यांनी केली आहे . तुषार कामठेंनी यासंदर्भात विभागीय आयुक्त सौरव राव यांना निवेदन दिले आहे . या निवेदनात म्हटले आहे की , पुणे शहर व जिल्ह्यात दिवसेंदिवस रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण होत आहे . अनेकांनी सदर इंजेक्शनची साठवणूक केल्याने ह्या इंजेक्शनचा तुटवडा निर्माण होत आहे .

सदर इंजेक्शनची साठवणूक करून जास्त किंमतीत हे इंजेक्शन विकत असल्याच्या अनेक घटना दररोज समोर येत आहेत . अशा आपत्कालीन वेळी रुग्णांच्या नातेवाईकांची आर्थिक फसवणूक सध्या होत आहे . अनेक रुग्णांच्या नातेवाईकांना हे इंजेक्शन मिळविण्यासाठी तासंतास रांगेत थांबावे लागत आहे. त्यातच रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या रुग्णांमुळे काही दिवसांनी ऑक्सिजनच्या बाबतीत अशीच परिस्थिती निर्माण होऊ शकते. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असल्याने रुग्णांना आवश्यक असणाऱ्या ऑक्सिजनचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे ऑक्सिजनच्या बाबतीत सुद्धा काळाबाजार होऊ शकतो .

त्यातच अनेक औद्योगिक कंपन्यांना ऑक्सिजनचा पुरवठा होतो . या कंपन्या भविष्यात ऑक्सिजनची साठवणूक करून त्याची काळ्या बाजारात विक्री करू शकतात . सदरची बाब गंभीर स्वरुपाची असल्याने आपण त्यामुळे सध्या ऑक्सिजनचा वापर फक्त वैद्यकीय वापरासाठी करावा , औद्योगिक वापरासाठी ऑक्सिजन देऊ नये .

ऑक्सिजनच्या तयार करणाऱ्या कंपन्या अधिग्रहित करून त्यावर शासन नियंत्रण ठेवावे जेणेकरून भविष्यात ऑक्सिजनचा काळाबाजार होणार नाही व त्याचा तुटवडा निर्माण होणार नाही असे तुषार कामठे यांनी निवेदनात म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.