पिंपरी : कोरोना बाधीत रूग्णांवरील उपचारासाठी रेमडिसीवीर इंजेक्शनची आवश्यकता निर्माण झाली आहे. या इंजेक्शनच्या 7 हजार 50 कुपी महापालिकेच्या वतीने खरेदी करण्यात येणार आहेत. त्यासाठी 46 लाख 58 हजार रूपये इतका खर्च होणार आहे.
कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी महापालिकेकडून आवश्यक ती दक्षता घेण्यात येत आहे. महापालिकेची विविध रूग्णालये तसेच कोरोना रूग्णांलयांमध्ये कोरोना बाधीत रूग्णांवर वैद्यकीय उपचार करण्यात येत आहेत. कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेऊन त्याचा मुकाबला करण्यासाठी तातडीने रेमडिसीवीर 100 एमजी या इंजेक्शनची आवश्यकता आहे.
रूग्णांवरील या उपचारासाठी रेमडिसीवीर इंजेक्शन खरेदी करण्याबाबत अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी यांनी 3 मार्च 2021 रोजी पत्राद्वारे मागणी केली आहे. त्या अनुषंगाने रेमडिसीवीर इंजेक्शन खरेदी करण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या. निविदा दर 1052 रूपये 68 पैसे प्रति कुपी असा अपेक्षित धरण्यात आला.
त्यामध्ये लक्ष्मी मेडीकल यांनी निविदा दरापेक्षा 37.16 टक्के कमी म्हणजेच 660 रूपये 80 पैसे प्रति कुपी हा लघुत्तम दर सादर केला. त्यानुसार, तातडीक मागणीच्या अनुषंगाने इंजेक्शनच्या 7 हजार 50 कुपी खरेदी करण्यात येणार आहेत. त्यासाठी 46 लाख 58 हजार रूपये इतका खर्च होणार आहे.