नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीत कोरोना व्हायरसच्या संसर्गाने स्थिती सातत्याने बिघडत चालली आहे. यामुळे होणार्या मृत्यूंचा आकडा सतत वाढत आहे. आता साकेतच्या फॅमिली कोर्टाच्या न्यायाधीशांचा कोरोना संसर्गाने मृत्यू झाला आहे.
न्यायाधीश कोवई वेणुगोपाळ संक्रमित झाले होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते, परंतु त्यांना वाचवणे शक्य झाले नाही. दिल्लीत कोरोना संक्रमितांची संख्या सातत्याने वाढत चालली आहे. बिघडलेली स्थिती पाहता केजरीवाल सरकारने दिल्लीत 6 दिवसांसाठी पूर्ण लॉकडाऊन लावला आहे.
वेणुगोपाळ यांचे वय सुमारे 50 वर्ष होते आणि ते तीन दिवसांपूर्वी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. या दरम्यान दिल्ली उच्च न्यायालयाने राष्ट्रीय राजधानीत कोरोना व्हायरसची प्रकरणे वेगाने वाढत असल्याने सोमवारी जिल्हा न्यायालयांना आदेश दिला की त्यांनी केवळ आवश्यक प्रकरणांवरच व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी करावी.
या आदेशावर एक दिवस अगोदर उच्च न्यायालयाने म्हटले होते की, ते यावर्षी दाखल प्रकरणांपैकी 19 एप्रिलपासून केवळ त्याच प्रकरणांवर सुनावणी करतील जी अतिशय आवश्यक आहेत.