मुंबई : राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या पाहता पुन्हा कडक लॉकडाऊन लागू होणार असल्याचे संकेत राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत. तसेच त्याबाबतचा निर्णय दोन दिवसांत घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले आहे.
विजय वडेट्टीवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी कोरोना परिस्थिती आणि त्यानंतर लॉकडाऊनबाबत भाष्य केले. ते म्हणाले, राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सध्या राज्यात निर्बंध लावले आहेत. मात्र, ते पुरेसे नसून, कडक लॉकडाऊन लागू करण्याची मागणी केली जात आहे. लोकांमधून 100 टक्के सर्व बंदची मागणी होत आहे. यावर स्थानिक पातळीवर निर्णय घेण्यात येतील.
कडक लॉडाऊनबाबत मुख्यमंत्री दोन दिवसांत निर्णय घेतील’. तसेच ‘दिल्लीत कडक लॉकडाऊन करण्यात आला असून, त्याबाबत माहिती मागितली आहे. त्यानंतर महाराष्ट्रातही ही कदाचित लॉकडाऊन नियमावलीत काही बदल करण्यात येतील. राज्यात लागू करण्यात आलेल्या संचारबंदीचा अपेक्षित असा फायदा होताना दिसत नाही, असेही वडेट्टीवार म्हणाले.
दरम्यान, राज्यात कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामध्ये संचारबंदीही लागू करण्यात आली आहे. यादरम्यान विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. तसेच अत्यावश्यक सेवा वगळता सर्व अस्थापने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पण आता संपूर्ण लॉकडाऊन केला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.