पिंपरी : सध्या देशासह, राज्यात कोरोना संसर्गजन्य रोगामुळे भयानक परस्थिती निर्माण झालेली आहे. अश्यातच काही पैश्यांसाठी नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. कोरोनाची RTPCR टेस्टचे बनावट पॉझिटिव्ह रिपोर्ट तयार करणारी टोळी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी पकडली आहे.
ही कारवाई वाकड येथे करण्यात आलेली असून लॅबच्या डॉक्टर बनावट शिक्के, लेटर हेड, रिपोर्ट जप्त करण्यात आलेले आहेत. पत्ताराम केसारामजी देवासी (33, रा. भगवाननगर, भूमकर चौक, वाकड) आणि राकेशकुमार बस्तीराम बेष्णव (25, रा. धनकवडी, पुणे) या दोघांना अटक केली आहे. तर चिरंजीव आणि राजू भट्टी या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर वाकड येथील शनी मंदिराजवळ बनावट कोरोना पॉझिटिव्ह रिपोट देणारी टोळी असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता हे दोघे आणि त्यांचे साथीदार नागरिकाना बनावट रिपोट देत असल्याचे स्पष्ट झाले. बावधन येथील लाइफनिटी वेलनेस इंटरनॅशनल लॅबच्या नावाचे बनावट रिपोट देत असल्याचे समोर आले.
पोलिसांनी या दोघाकडून लेटरहेड, डॉक्टरच्या नावाचे शिक्के, स्वाक्षरी असे साहित्य जप्त केले आहे. पोलीस त्यांच्या इतर साथीदारांचा शोध घेत आहेत.