पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात मागील दोन महिन्यांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत प्रचंड वाढ होत आहे. दिवसाला साडेतीन हजाराच्या आसपास नवीन रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे रुग्णालयात दाखल होणा-या रुग्णांचे प्रमाणही जास्त आहे. वाढत्या रुग्णांमध्ये गंभीर, अतिगंभीर रुग्णांचीही संख्या जास्त आहे. अनेक रुग्णांना ऑक्सिजनची गरज लागते. व्हेंटिलेटरवरील रुग्णाला जास्त ऑक्सीजन लागतो.
महापालिकेच्या पाच हॉस्पिटलसाठी दरदिवशी 55 टन ऑक्सिजन लागतो. तर, जम्बो कोविडसाठी ऑक्सिजन 25 टन ऑक्सिजनच्या दैनंदिन पुरवठ्याची आवश्यकता आहे. मात्र, ऑक्सिजनची मागणी आणि पुरवठा यात अंतर पडत आहे.
त्यामुळे ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. जम्बो सेंटरसाठी ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या एका पुरवठादाराने अचानक पुरवठा बंद केला. त्यामुळे ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाली आहे.
”व्हेंडर्सकडून ऑक्सिजन उपलब्ध करुन आत्तापर्यंतची मागणी पूर्ण करत आहोत. ऑक्सिजनची कमतरता शहरापुरती मर्यादित नाही. संपूर्ण राज्यभरात ऑक्सिजनची समस्या आहे. परंतु, महापालिका ज्या सोर्सकडून ऑक्सिजन मिळेल तेथून आणून रुग्णांची गरज पुरवित आहे. दररोज ऑक्सिजनचा पुरेसा साठा उपलब्ध करुन घेतला जातो”. असे महापालिकेचे प्रवक्ते शिरीष पोरेड्डी म्हणाले आहे.