वाकड येथिल इंदिरा स्कूलची मान्यता रद्द करा : विशाल वाकडकर

शिक्षण शुल्कसाठी 174 विद्यार्थ्यांना दाखले दिले परत

0

पिंपरी : वाकड येथिल इंदिरा नॅशनल स्कूलच्या व्यवस्थापनाने 174 विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांची मागणी नसताना पटावरुन कमी करुन दाखले दिले आहेत. दाखले देताना शिक्षण शुल्क भरले नसल्याचे कारण व्यवस्थापनाने दिले आहे. शिक्षण हक्क अधिनियम 2009 च्या कलम 16 चा इंदिरा नॅशनल स्कूलच्या व्यवस्थापनाने भंग करुन 174 विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आणले आहे. त्यामुळे या शाळेची मान्यता रद्द करुन व्यवस्थापनावर कायदेशीर कारवाई करावी आणि या सर्व विद्यार्थ्यांना पून्हा प्रवेश मिळवून द्यावा.

अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉंग्रसचे अध्यक्ष विशाल वाकडकर यांनी शिक्षण उपसंचालक, पुणे विभाग, पुणे यांच्याकडे प्रत्यक्ष पत्र देऊन केली आहे.

या पत्रात विशाल वाकडकर यांनी पुढे म्हटले आहे की, या विद्यार्थ्यांचे शालेय व्यवस्थापनाने अचानक ऑनलाईन शिक्षण बंद केले. त्यामुळे पालकांना व विद्यार्थ्यांना धक्का बसला आहे. मागिल पुर्ण वर्ष कोरोना कोविड -19 च्या सावटाखाली गेले. लॉकडाऊन मुळे औद्योगिक, कामगार, व्यवसाय, व्यापारी मंदीचा सामना करीत आहेत. यामध्ये शहरातील लाखो लोकांचे रोजगार बंद झाले आहेत.

न्यायालयाने देखिल शालेय व्यवस्थापनांना शिक्षण शुल्क आकारणी बाबत आदेश दिले आहेत. राज्य सरकारने देखिल याबाबत स्वतंत्र आदेश दिले आहेत. तरी देखिल इंदिरा नॅशनल स्कूलच्या व्यवस्थापनाने मा. उच्च न्यायालयाच्या आदेशाचा चुकीचा अर्थ काढून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आणले आहे. त्यामुळे या शाळेवर कडक कायदेशीर कारवाई करुन त्यांची मान्यता रद्द करावी अशीही मागणी विशाल वाकडकर यांनी या पत्रात केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.