पिंपरी : विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यासोबतच त्यांची देखील पोलिसांनी कोरोना अँटीजेन टेस्ट केली. या टेस्टिंगमध्ये आज सकाळपासून सात ते आठ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
ज्या रुग्णांना काहीही लक्षणे नाहीत त्यांना होम क्वारंटाईन केले जात आहे. तर सौम्य लक्षणे असणाऱ्यांवर योग्य उपचार केले जात आहेत. गंभीर लक्षणे असणाऱ्या रुग्णांना रुग्णालयात दाखल केले जाणार आहे. त्यामुळे कारवाईसोबतच पोलिसांनी आता जनजागृती देखील सुरू केली आहे.
कोरोनाचा प्रसार फार वेगाने होत आहे. हॉस्पिटलमध्ये बेड मिळणं सध्या जिकरीचे झाले आहे. विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाया केल्या जात आहेत. ही मोहीम पुढे वाढवून पोलिसांकडून जनजागृतीपर काम देखील मोठ्या प्रमाणात केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून दापोडी बाजारपेठेत विक्रेत्यांना मास्क, सॅनिटायझर वाटप करून त्यांची जनजागृती करण्यात आली आहे.
दापोडी पोलीस चौकीमध्ये अँटिजेन टेस्ट कॅम्प आयोजित करण्यात आला आहे. परिसरात विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्या नागरिकांना दापोडी चौकीतील कॅम्पमध्ये आणून त्यांची कोरोना अँटीजेन टेस्ट केली जात आहे. यात पॉझिटिव्ह आल्यास पुढील कार्यवाही देखील पोलीस करत आहेत.