पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्याची तक्रार पतीने घेतली मागे

खोटा जबाब दिल्याने पतीने केली होती गुन्हा दाखल करण्याची मागणी

0

पुणे : पत्नीने खोटा जबाब दिला म्हणून तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची तक्रार पतीने तडजोड करीत मागे घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, कोरोना विषय नियमांमुळे पतीला स्वतः हजर राहणे शक्य झाले नाही. त्यामुळे पतीचा जबाब व्हॉटस्अप व्हिडिओ कॉलद्वारे नोंदविण्यात आला. त्यानंतर न्यायाधीश जे. व्ही. भेंडे यांनी हे प्रकरण निकाली काढले.

यातील पती राजेश बंगळूर येथे राहतात. जिल्हाबंदीमुळे त्यांना तारखेला हजर राहणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांचे वकील अ‍ॅड. हेमंत झंजाड यांनी न्यायालयास अर्जदारांचा जबाब व्हॉटस् अप व्हिडिओ कॉलद्वारे नोंदविण्यात यावा, अशी विनंती केली. त्यानुसार झालेल्या सुनावणीनंतर हे प्रकरण मिटले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, राजेश हे बंगळूरला राहतात. तर त्यांची पत्नी नेहा पुण्यात. २००७ साली त्याचे लग्न झाले होते. त्यानंतर झालेल्या कौटुंबिक वादामुळे त्यांनी २०११ साली घटस्फोटाचा दावा दाखल केला. यावेळी, न्यायालयात त्यांच्यावर अन्य दावेही चालू होते. यादरम्यान, एका दाव्यामध्ये नेहाने न्यायालयात खोटा जबाब दिला. या कारणावरून राजेश याने तिच्याविरुद्ध फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार २०१५ साली दिली होती.

अ‍ॅड. झंजाड यांमार्फत दाखल केलेली तक्रार अनेक वर्ष न्यायालयात सुनावणी सुरू होऊन प्रलंबित राहिली. यादरम्यान, न्यायाधीशांनी दोघांनी आपसांत तडजोड करावी या उद्देशाने दोघांनाही त्याबाबत समज दिली. त्यानुसार दोघांनीही आपापसांत चर्चा करून दाव्यामध्ये तडजोड करण्याचे मान्य केले.

Leave A Reply

Your email address will not be published.