मुंबई : पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना 100 कोटी रुपयांच्या वसूलीचे टार्गेट दिल्याचा गंभीर आरोप मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी ‘लेटरबॉम्ब’च्या माध्यमातून केला होता. यानंतर यावर बरेच खलबते झाले आणि आता सीबीआय चौकशी सुरू आहे. मात्र आता परमबीर सिंग यांच्यावरच एका पोलिस निरीक्षकाने ‘लेटरबॉम्ब’ करत भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत.
अकोला येथे पोलिस नियंत्रण कक्षात सेवेत असलेले पोलिस निरीक्षक बी. आर. घाडगे यांनी राज्याचे पोलिस महासंचालक संजय पांडे यांना 14 पानांचे पत्र लिहून परमबीर सिंग यांच्यावर भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप केला आहे. या पत्राची प्रत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनाही पाठवण्यात आली आहे. याबाबतचे वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. बी. आर. घाडगे यांनी हे पत्र 20 एप्रिल रोजी लिहिले आहे. त्यामध्ये त्यांनी भ्रष्टाचार प्रकरणी परमबीर सिंग यांच्यावर एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे. परमबीर सिंग हे 2015 ते 2018 या दरम्यान ठाण्याचे पोलिस आयुक्त होते. त्यावेळी त्यांनी पदाचा दुरुपयोग करून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला, असा दावा या पत्रात करण्यात आला आहे.
परमबीर सिंग यांनी भूखंडाचे व्यवहार, सरकारी निवासस्थाने आणि सुरक्षा कर्मचारी यांचा गैरवापर केला. तसेच त्यांनी इतर काही मार्गांनी भ्रष्टाचार केल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे. परमबीर सिंग यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे माझ्याकडे आहेत आणि मला जेव्हा जबाब नोंदवण्यासाठी बोलावले जाईल तेव्हा मी ते पुरावे सादर करेन, असेही घाडगे यांनी पीटीआयला सांगितले.
आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांच्यावर यापूर्वी मुंबई पोलिस दलातील अधिकारी अनुप डांगे यांनीही तक्रार करून भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. त्यानंतर आता बी. आर. घाडगे यांनीही भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत.