मुंबई : 100 कोटी वसुलीला आरोप आणि गुन्हा दाखल झालेल्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख प्रकरणात सीबीआयने वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांचा जबाब नोंदवला. तर या प्रकरणात सीबीआय शुक्ला यांना साक्षीदार करणार आहे.
सीबीआयने याआधी अनिल देशमुख, त्यांचे दोन पीए संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांचे जबाब नोंदवले आहेत. तर निलंबित पोलीस निरीक्षक सचिन वाझे आणि त्याच्या दोन वाहन चालकांसह अनेकांचे जबाब रेकॉर्ड करण्यात आले आहेत. 21 एप्रिलला रश्मी शुक्ला यांचा जबाब नोंदवल्याची माहिती आहे.
आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी राज्य सरकारकडून चौकशी होण्यापूर्वीच महाविकासआघाडीचा ‘कार्यक्रम’ उरकून टाकला, असे वक्तव्य भाजप नेते अतुल भातखळकर यांनी केले होते. हैदाराबादमध्ये काही दिवसांपूर्वी केंद्रीय अन्वेषण विभागाने रश्मी शुक्ला यांची चौकशी केली. या चौकशीत रश्मी शुक्ला यांनी महाविकास आघाडीतील दोन नेत्यांची नावं उघड केल्याचा गौप्यस्फोट अतुल भातखळकर यांनी केला.