भाजपच्या बनावट सोशल मीडिया अकाउंटवरून शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी

0

पिंपरी : भाजप नेत्यांच्या आणि पक्षाच्या नावाने सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून त्यावरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या बाबत आक्षेपार्ह लिखाण करून बदनामी करत त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी तब्बल 26 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत नोडल सायबर पोलीस ठाणे, मुंबई येथे दाखल करून तो पिंपरी चिंचवडमधील सांगवी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे युवक प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत संभाजी वरपे (34, रा. पिंपळे निलख, पुणे) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. हा प्रकार 27 मार्च ते 7 एप्रिल 2021 या कालावधीत बनावट फेसबुक पेज, फेसबुक अकाउंट आणि ट्विटर अकाउंट या सोशल मीडियावर घडला आहे.

त्यानुसार पेज CM Devendra Fadanvis Fan Club Posted by Dhananjay Joshi, राजकारण महाराष्ट्राचे posted by Atul Aychit, राजकारण महाराष्ट्राचे posted by Sonali Rane, भाजप सोशल मीडिया वॉर रूम महाराष्ट्र Posted by Madhukar Waghmare, टकलु हैवान, Devendra Fadanvis for Maharashtra या फेसबुक पेज चालवणा-या व्यक्ती

तसेच फेसबुक अकाउंट धारक राजेंद्र पवार, गिरीश गणू, सिद्धार्थ जोशी, विश्वम्बर देव, गोविंद कुलकर्णी, धनंजय जोशी, महेश गबुडले, विक्रांत एस जोशी, नाना पंडित, राम शिंदे पाटील, शशिकांत आहिरे, राधा माने, सोनाली राणे, भानू बोराडे, सचिन दाभाडे पाटील, श्रीकांत पाटील, नितीन मताले, दयानंद पाटील, अजय राठोड आणि ट्विटर अकाउंट धारक Rudra_dev, विमुक्त आदींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी बनावट फेसबुक पेज, फेसबुक अकाउंट, ट्विटर अकाउंट या सोशल मीडियावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात आक्षेपार्ह, हिणकस, विकृत, बदनामीकारक लिखाण केले. तसेच सोशल मीडियावरून शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

फिर्यादी राष्ट्रवादीचे युवक प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वरपे यांनी याबाबत नोडल सायबर पोलीस ठाणे, मुंबई येथे गुन्हा दाखल केला. त्यानंतर तो गुन्हा सांगवी पोलिसांकडे तपासासाठी वर्ग करण्यात आला आहे. सांगवीचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय भोसले तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.