पुणे : अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्याला न्यायालयाने सात वर्षे सक्तमजुरी आणि 18 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. आर. पूरवार यांनी हा निकाल दिला.
सुशील दिनेश भडकवाड (वय 30) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्याचे नाव आहे. जुलै 2016 मध्ये हा प्रकार घडला.
पीडित 17 वर्षीय मुलीच्या आईने याबाबत पोलिसात फिर्याद दिली आहे. या खटल्याचे कामकाज सरकारी पक्षातर्फे प्रमुख जिल्हा सरकारी वकील एन. डी. पाटील आणि अतिरिक्त सरकारी वकील हेमंत मेंडकी यांनी पाहिले. तर वानवडी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक व्ही. व्ही. घाटे यांनी या प्रकरणाचा तपास केला. त्यांना न्यायालयीन कामकाजासाठी हवालदार ए. एस. गायकवाड आणि पी. पी. पवार यांनी मदत केली.
सुशील याने फूस लावून संबंधित अल्पवयीन मुलीला उस्मानाबाद येथे पळवून नेले. त्यानंतर तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. पोलिसांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केले. त्यावर सरकारी पक्षाच्या युक्तिवादानंतर भारतीय दंड संहिता कलम 363,366 आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार शिक्षा सुनावली. दंडांपैकी 15 हजार रुपये पीडितेला नुकसान भरपाई म्हणून देण्यात यावी, असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.