पिंपरी चिंचवड महापालिका १५ लाख लस खरेदी करणार
पिंपरी : शहरवासीयांच्या जीविताचा विचार करुन महापालिका १५ लाख कोरोना प्रतिबंधक लस स्वखर्चाने खरेदी करणेकामी तयार आहे. त्याअनुषंगाने महाराष्ट्र शासनाची त्वरीत परवानगी मिळावी अशी मागणी महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केली. महापौर माई ढोरे यांचे दालनात आयुक्त राजेश पाटील यांचे समवेत झालेल्या बैठकीत सदरची मागणी करण्यात आली.
या बैठकीस उपमहापौर हिराबाई उर्फ नानी घुले, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती अड.नितीन लांडगे, क्रीडा सभापती उत्तम केंदळे, माजी महापौर नितीन काळजे, राहूल जाधव, माजी उपमहापौर केशव घोळवे, तुषार हिंगे, नगरसदस्य एकनाथ पवार, बापु उर्फ शत्रुघ्न काटे, संतोष लोंढे, विलास मडिगेरी, अभिषेक बारणे, शशिकांत कदम, तुषार कामठे नगरसदस्या ममता गायकवाड, सीमा सावळे , आशा धायगुडे – शेंडगे, सुजाता पालांडे, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे उपस्थित होते.
कोरोना विषाणुचा वाढता संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्याकरिता महानगरपालिकेच्या वतीने विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने सर्व शहरवासीयांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. तथापि लशींच्या अपु-या पुरवठ्यामुळे लसीकरणाची संख्या कमी आहे. त्यामुळे लस उत्पादक कंपनीकडून सदर लस थेट खरेदी करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. त्यासंबंधीचा लस खरेदी करण्याचा ठराव नुकत्याच झालेल्या स्थायी समिती सभेत मंजूर करण्यात आला असल्याची माहिती महापौर माई ढोरे यांनी दिली.
तसेच महानगरपालिका रुग्णालयातील कोरोनाविषयक कामकाज गतिमान होण्याकामी रुग्णालय प्रशासनासोबत नगरसदस्यांची टीम कार्यरत राहणार आहे. कोरोनाच्या तिस-या संभाव्य लाटेचा विचार करुन लहान मुलांना असणारा धोका टाळण्यासाठी त्यांचेकरिता स्वतंत्र हॉस्पिटल तयार करणेबाबत महापौरांनी आयुक्तांना निर्देश दिले आहेत अशी माहितीही महापौर माई ढोरे यांनी यावेळी बोलताना दिली.