पिंपरी : पिंपरी-चिंचवड येथील ऑटो क्लस्टर रुग्णालय चालविणाऱ्या स्पर्श रुग्णालयाचे उद्योग काही केल्या थांबेना झालेत. महापालिकेने मोफत उपलब्ध करून दिलेले रेमडेसिवीर इंजेक्शन तब्बल 40 हजार रुपयांना काळ्या बाजारात विकताना “स्पर्श’च्या कर्मचाऱ्यासह तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने करोना रुग्णांवर मोफत उपचार करण्यासाठी ऑटो क्लस्टर येथे कोविड समर्पित रुग्णालय उभारले आहे. या रुग्णालयाला मेडिकल व पॅरामेडिकल कर्मचारी पुरविण्याचा ठेका स्पर्श हॉस्पिटलला देण्यात आला आहे. या हॉस्पीटलच्या दोन डॉक्टरांनी बेडसाठी पैसे घेतल्यामुळे त्यांना अटक झाली आहे. याच मुद्यावर सर्वसाधारण सभेतही मोठा गोंधळ झाला होता. त्यानंतर महापालिका आयुक्तांनी दहा दिवसांत “स्पर्श’वर कारवाईचे आश्वासन दिले होते. मात्र अद्यापही कारवाई न करता या ठेकेदाराला पाठीशी घालण्याचे काम चालविले होते. बेडसाठी पैसे घेतल्याच्या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच आता स्पर्श हॉस्पीटलच्या वतीने ऑटो क्लस्टर येथे ब्रदर म्हणून काम करणाऱ्या अजय बाबाराज दराडे याला रेमडेसिवीर काळ्या बाजारात विकताना अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आरोपी नितीन हरीदास गुंड (23, रा. काळेवाडी, सागर काकासाहेब वाघमारे (24 रा. काळेवाडी) व अजय बाबाराज दराडे (19 रा. पिंपरी) हे तिघे काळ्याबाजारात रेमडेसीवीर विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी बनावट ग्राहकामार्फत नितीन गुंड याच्याशी संपर्क साधून इंजेक्शनबाबत विचारणा केली. त्यावेळी दोन इंजेक्शन मिळतील असे सांगितले. तसेच प्रत्येकी 40 हजार प्रमाणे दोन इंजेक्शनसाठी 80 हजारांची मागणी केली. इंजेक्शन घेण्याची तयारी दाखविल्यानंतर आरोपींनी काळेवाडी येथील डेंटल प्लॅनेट हॉस्पीटलसमोर येण्यास सांगितले.
यावेळी पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाचे पथक आणि अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने संयुक्त कारवाई करत वरील तीनही आरोपींना व त्यांच्याकडील रेमडेसिवीरची दोन इंजेक्शन ताब्यात घेण्यात आली. यानंतर आरोपींकडे चौकशी केली असता ऑटो क्लस्टर येथे ब्रदर म्हणून काम करणाऱ्या अजय बाबाराज दराडे याच्याकडून इंजेक्शन घेतल्याची कबुली आरोपींनी दिली.
त्यानुसार तिघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडील 25 हजार रुपये किंमतीचे 3 मोबाईल, 4 हजार 389 रुपये किंमतीची दोन इंजेक्शन असा 30 हजार 389 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पिंपरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सुरू आहे.