इंदापूर तालुक्यातील सपकळवाडीने घालून दिला आदर्श

लोकसहभागातून सुरू केलेले कोविड सेंटर ठरत आहे, मार्गदर्शी उपक्रम

0
इंदापूर : बारामती लोकसभा मतदार संघातील इंदापूर तालुक्यात असलेलं सपकळवाडी हे अवघ्या दीड हजार लोकसंख्येचं गाव. कोरोनावर मात करण्यासाठी या गावाने सुरू केलेला उपक्रम अत्यंत आदर्शवत ठरत असून सध्या आजूबाजूच्या गावांनी सुद्धा त्यांचे अनुकरण सुरू केले आहे. आतापर्यंत ५९ ग्रामपंचायतींनी संपर्क करत येथील मॉडेल स्वीकारले असून रोज एक दोन ग्रामपंचायती भेट देत आहेत.
खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाचे उदघाटन राज्यमंत्री दत्ता मामा भरणे यांच्या हस्ते करण्यात आले होते. संपूर्ण देशात सध्या कोरोनाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. रुग्णांसाठी खाटा उपलब्ध नसण्यापासून अन्य अनेक अडचणी येत आहेत. अशा परिस्थितीत योग्य नियोजन आणि नियमित पाठपुरावा केला तर कोणत्याही अडचणींवर सहज मात करता येते याचे उदाहरणच या गावाने घालून दिले आहे.

गावातील डॉ. राकेश मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली सपकळवाडीतील कोरोना नियंत्रण आणि विलगिकरण समितीने सप्टेंबर २०२० मध्ये येथे १० खाटांचा विलगिकरण कक्ष सुरू केला आहे. विशेष म्हणजे आजतागायत ग्रामपंचायतीचा एकही रुपया खर्च न होता हा कक्ष सुरू असून एकही रुग्ण दगावला नाही. समितीचे अध्यक्ष सचिन सपकळ यांनी ही माहिती दिली. वेगवेगळ्या सामाजिक संस्था आणि गावातील नोकरी व्यवसाय करत असलेल्या नागरिकांनी एकमेकांच्या सहकार्याने सुरू केलेला हा विलगिकरण कक्ष म्हणजे महाराष्ट्रासमोर घालून दिलेला एक मार्गदर्शी प्रकल्प म्हणता येईल, अशी व्यवस्था येथे करण्यात आली आहे. शाळेच्या इमारतीत सुरू करण्यात आलेल्या या विलगिकरण कक्षासाठी बारामती येथील रोटरी क्लबने रुग्णसेवेसाठी दहा खाटा उपलब्ध करून दिल्या आहेत, तर बारामती ऍग्रोकडून सॅनिटाझर मिळत आहे. याशिवाय गावकऱ्यांपैकी कोणी दूरदर्शन संच, कोणी पंखे, तर कोणी वाशिंग मशीन अशा वस्तू उपलब्ध करून आपापले योगदान दिले आहे.डॉ. राकेश मेहता हे याठिकाणी विनामूल्य रुग्णसेवा करत असून स्थानिक पातळीवरच रुग्णांची अत्यंत योग्य रीतीने काळजी घेण्यात येत आहे. प्राथमिक पातळीवर कोरोनाचे निदान होताच तातडीने त्या रुग्णाला याठिकाणी दाखल केले जाते. सतत चौदा दिवस त्याच्यावर लक्ष ठेऊन बाहेर कुठेही जाऊ न देता कक्षातच गरजेनुसार उपचार केले जातात. गरज असेल, किंवा अत्यवस्थ परिस्थिती निर्माण झाली तर लागलीच त्या रुग्णाला येथून बाहेरील रुग्णालयात पाठवले जाते.
अशा रीतीने अगदी नियोजनबद्ध रुग्णसेवा सुरू असल्यामुळे तो रुग्ण खडखडीत बरा तर होतोच, शिवाय वयक्तिकरित्या प्रत्येक रुग्णावर लक्ष ठेवल्यामुळे, त्याला कोणत्याही परिस्थितीत कक्षातून बाहेर जाऊ न दिल्यामुळे त्याच्या कुटुंबासहित अन्य कोणालाही त्याच्यापासून संसर्ग होत नाही. नियंत्रण समिती दिवसातून दोन वेळा रोजच्या रोज या कक्षाला भेट देऊन प्रत्येक रुग्णाची माहिती घेते. पुढील आवश्यक व्यवस्था पाहते. आतापर्यंत ३५ कोरोनाबाधित रुग्ण याठिकाणी पूर्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर ७० ते ७५ जणांवर याठिकाणी उपचार करण्यात आले आहेत, असे सपकळ यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.