रेमडेसिव्हिरची बेकायदेशिररित्या विक्री करणा-‍याचा जामीन फेटाळला

0

पुणे : कोरोना बाधीत रुग्णांसाठी वापरण्यात येणा-‍या रेमडेसिव्हिर इंजेक्शनची बेकायदेशीररित्या विक्री करणा-‍या तरुणाचा जामीन अर्ज सत्र न्यायाधीश व्ही. आर जगदाळे यांनी फेटाळला. कोविड रुग्णासाठी रेमडिसिव्हर संजीवनी ठरत असताना त्याचा काळाबाजार ही समाजासाठी घातक गोष्ट असल्याचेही न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे.

कृष्णा भास्कर हावणे (वय २५, रा. भोसरी. मुळ रा. बीड) असे जामीन फेटाळण्यात आलेल्याचे नाव आहे. २५ एप्रिल रोजी रात्री दोनच्या सुमारास भोसरी परिसरातील संजीवनी कॉलनी परिसरात हा प्रकार उघडकीस आला होता. याबाबत, अन्न व औषध प्रशासनाच्या औषध निरीक्षकांनी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कृष्णा याने कोरोना रुग्णां देण्यात येणारी औषधे परवाना नसताना बाळगली. तसेच, स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी छापील किरकोळ किंमतीपेक्षा अधिक दराने तसेच खरेदी करणा-‍याला कोणतेही बील न देता, डॉक्टरांच्या चिठ्ठी तसेच विना कोविड तपासणी अहवाल शिवाय विक्री केली.

या गुन्ह्यात जामीन मिळावा यासाठी त्याने न्यायालयात अर्ज केला. त्यास सरकारी वकील प्रदीप गेहलोत यांनी विरोध केला. आरोपीने केलेला गुन्हा गंभीर स्वरुपाचा आहे. गुन्ह्याच्या तपास अद्याप सुरू असून त्याला जामीन दिल्यास त्याला कायद्याची भिती राहणार नाही. त्याला जामीन दिल्यास तो या स्वरुपाचा गुन्हा पुन्हा करण्याची दाट शक्यता असून त्याविरोधात अद्याप दोषारोपपत्र दाखल करायचे असल्याने त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात यावा, असा युक्तिवाद अ‍ॅड. गेहलोत यांनी केला.

Leave A Reply

Your email address will not be published.