आता ‘यास’ चक्रीवादळाची टांगती तलवार

0

मुंबई : अरबी समुद्रात आय अर्थात केंद्रबिंदू असलेलं तौते चक्रीवादळ भारताच्या पश्चिम किनारपट्टीशी समांतर प्रवास करत गुजरातच्या किनारी भागात धडकलं. मंगळवारी दुपारी या वादळाचा गुजरातच्या किनारपट्टीवर लँडफॉल झाला आणि हळूहळू त्याची तीव्रता कमी झाली. पण तौते वादळाची तीव्रता कमी होते न होते तोवर आता यास चक्रीवादळाची टांगती तलवार किनारी भागावर निर्माण झाली आहे. समुद्रातील कमी दाबाचा पट्टा जर अधिक तीव्र झाला आणि त्याचं चक्रीवादळात रुपांतर झालं, तर ते ‘यास’ म्हणून ओळखलं जाईल. वातावरणात योग्य ते बदल झाल्यास २६ मेच्या संध्याकाळी हे वादळ किनारी भागात धडकेल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

बंगालच्या उपसागरामध्ये हवामानात होत असलेल्या बदलांमुळे परिस्थिती आधी वादळ आणि त्यात तीव्र बदल झाल्यास त्याचं रुपांतर चक्रीवादळात होण्याची शक्यता आहे. पुढच्या दोन दिवसांमध्ये बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊ शकतो. याचं रुपांतर चक्रीवादळात होण्याचीही शक्यता आहे. विशेषत: अंदमान बेटांजवळच्या सागरी भागावर हा तीव्र कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान, २१ मेपासूनच बंगालच्या उपसागरातील परिस्थिती धोकादायक असणार आहे. वारे वेगाने वाहणार असून त्यामुळे समुद्र खवळलेला असू शकतो. त्यामुळे मच्छीमारीसाठी समुद्रात गेलेल्या मासेमारांनी आपल्या बोटी पुन्हा किनाऱ्यावर आणाव्यात, असं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे. अंदाजे २२ मेपासून हा कमी दाबाचा पट्टा उत्तर अंदमानजवळच्या समुद्रात तयार व्हायला सुरुवात होईल. २२ आणि २३ मे रोजी अंदमान-निकोबारमध्ये तुफान पाऊस होण्याची शक्यता आहे. अशीच पर्जन्यवृष्टी ओडिशा, पश्चिम बंगाल, मेघालय आणि आसाममध्ये देखील होईल. हे चक्रीवादळ तयार झाल्यास त्याच्या दिशेनुसार ओडिशा किंवा पश्चिम बंगाल या राज्यांच्या किनारी भागात धडकण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे

Leave A Reply

Your email address will not be published.