‘यास’ चक्रीवादळाच्या अनुषंगाने राज्यांना दिले सतर्कतेचे आदेश

0

नवी दिल्ली : भारताच्या पूर्व किनारपट्टीवर नवं चक्रीवादळ घोंघावू लागलं आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा अधिक वेगाने वाढला, येत्या २६ मे रोजी ‘यास’ चक्रीवादळ भारताच्या पूर्व किनारपट्टीवर धडकणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. त्या दृष्टीने आता केंद्र सरकारने देखील तयारी सुरू केली असून पूर्व किनारपट्टीवर ज्या ज्या राज्यांना ‘यास’ चक्रीवादळाचा धोका आहे, त्या राज्यांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. चक्रीवादळामुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य परिस्थितीसाठी NDRF च्या तुकड्या देखील सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.

हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार २६ मे रोजी यास चक्रीवादळ पश्चिम बंगाल किंवा ओडिशा या राज्यांच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. मात्र, केंद्र सरकारने सुरक्षेचा उपाय म्हणून पश्चिम बंगाल आणि ओडिशासोबतच आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि अंदमान-निकोबारमधील प्रशासनाला सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देखील या राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून किनारी भागामध्ये आरोग्य व्यवस्था अधिक वाढवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्याशिवाय, यास चक्रीवादळाच्या मार्गात येणाऱ्या प्रदेशामध्ये असलेल्या रुग्णालयांमधील रुग्णांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासाठी आवश्यक ती सर्व प्रकारची मदत देण्याचं आश्वास केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून करण्यात आलं आहे.

यास चक्रीवादळ २६ मे रोजी पश्चिम बंगाल किंवा ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता गृहित धरून एनडीआरएफ अर्थात National Disaster Response Force सज्ज झाली आहे. एनडीआरएफनं आपल्या काही टीम तौते चक्रीवादळामुळे बसलेल्या तडाख्यामध्ये बचावकार्य आणि पुनर्वसन कार्यासाठी पाठवल्या होत्या. त्या टीम माघारी बोलावण्यात येत आहेत. तसेच काही तुकड्या पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये पाठवायला सुरुवात देखील करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.