शेअर बाजार : १० हजार रुपयांचे झाले अडीच कोटी रुपये

0

मुंबई : फक्त १०,००० रुपयांचे १६ वर्षात झाले २.५३ कोटी रुपये. शेअर बाजारातील गुंतवणुकीने निर्माण केलेली ही जादू आहे. शेअर बाजारातील गुंतवणुकीत मोठी जोखीम असते मात्र जर दीर्घ कालावधीसाठी ही गुंतवणूक करण्यात आली तर छोट्याशा गुंतवणुकीतून मोठी संपत्ती निर्माण करता येते. असेच काही कंपन्यांचे शेअर्स आहेत ज्यात १६ वर्षांपूर्वी केलेल्या छोट्याशा गुंतवणुकीने छोट्या गुंतवणुकदारांना कोट्यधीश बनवले आहे. या काही कंपन्यांच्या शेअर्सनी थोडाथोडका नव्हे तर तब्बल २,५०,००० टक्क्यांचा परतावा देत गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे.

सिम्फनी – (Symphony)

एअर कूलर उत्पादनाच्या क्षेत्रातील या कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स कंपनीची १९९४ मध्ये शेअर बाजारात नोंदणी झाली. एअर कूलर, डेझर्ट कूलर, रुम कूलर, पर्सनल कूलर, पोर्टेबल कूलर इत्यादींचे उत्पादन करणारी ही कंपनी अमेरिका खंड, आशिया खंड, आफ्रिका खंड आणि युरोप खंडातील ६० देशांमध्ये व्यवसाय करणाऱ्या या अहमदाबादस्थित कंपनीने मागील १६ वर्षात कल्पनेपलीकडील दणदणीत परतावा दिला आहे. सिम्फनीने मागील १६ वर्षात २,५३,००० टक्क्यांचा छप्परफाड परतावा देत गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे.

आयशर मोटर्स – (Eicher Motors)

आणखी एका कंपनीने गुंतवणुकदारांना कोट्यधीस बनवले आहे. ती कंपनी म्हणजे आयशर मोटर्स. वाहन उत्पादनाच्या क्षेत्रातील या कंपनीचा शेअर १६ वर्षांपूर्वी फक्त १९.१० रुपयांच्या पातळीवर होता. सध्या आयशर मोटर्सचा शेअर २,५२४ रुपयांच्या पातळीवर व्यवहार करतो आहे. आयशर मोटर्सने गुंतवणुकदारांना मागील १६ वर्षात तब्बल १,४६,१७१ टक्क्यांचा घवघवीत परतावा दिला आहे.

बालकृष्ण इंडस्ट्रीज – (Balkrishna Industries)

ही आणखी एक कंपनी जिच्या शेअरने गगनभरारी घेतली आहे. २००१ मध्ये बालकृष्ण इंडस्ट्रीजच्या शेअरची किंमत होती फक्त १.३ रुपया. एका चॉकलेटच्या टॉफीएवढी किंमत. आज या कंपनीचा शेअर २,१३० रुपयांच्या पातळीवर व्यवहार करतो आहे.

कित्येक पटींनी वाढलेल्या कंपन्या

जर तुम्ही भारतातील चांगल्या कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक केली आणि दीर्घकालावधीसाठी ही गुंतवणूक केली तर तुम्ही पैसा न कमावण्याची शक्यता अगदीच नगण्य आहे. कंपनीच्या एका तिमाहीत कशी कामगिरी झाली आहे किंवा तात्पुरत्या चढउतारांचा कंपनीच्या शेअरच्या किंमतीवर होणार परिणाम यावर लक्ष न देता दीर्घ कालावधीसाठी कंपनीची कामगिरी पाहिली आणि आपली गुंतवणूक केली तर त्यातून भरघोस कमाई करता येते. चांगल्या कंपन्या निवडा आणि त्यात दीर्घ कालावधीसाठी पैसे गुंतवा, असे मत शेअर बाजारातील जाणकार व्यक्त करतात.

तज्ज्ञांनुसार अशा काही कंपन्या आहेत ज्यांचा महसूल सलग १० वर्षे दरवर्षी १० टक्क्यांनी वाढला आहे आणि त्यांनी गुंतवणुकीवर १५ टक्क्यांचा वार्षिक परतावा दिला आहे. तर बीएसई५०० स्टॉक्समध्ये जवळपास २११ अशा कंपन्या आहेत ज्यांच्या शेअरच्या किंमतीत मागील १६ वर्षात १० पटीने वाढ झाली आहे, तर ६१ अशा कंपन्या आहेत ज्यांच्या शेअरच्या किंमतीत १०,००० टक्क्यांनी वाढ झाली आहे आणि अशा ५ कंपन्या आहेत ज्यांच्या शेअरच्या किंमतीत ५०,००० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.