मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात अमलीपदार्थ नियंत्रण विभाग अर्थात NCB ने सर्वात मोठी कारवाई केली आहे. NCB ने सुशांतसिंह राजपूतचा रुममेट आणि मित्र सिद्धार्थ पिठाणी याला अटक केली आहे. सिद्धार्थला हैदराबादेतून अटक करण्यात आली. धक्कादायक म्हणजे सुशांतसिंह राजपूतला ड्रग्ज दिल्याच्या कटात हात असल्याचा आरोप सिद्धार्थ पिठाणीवर आहे.
सुशांत सिंह राजपूतने 14 जून 2020 रोजी आत्महत्या केली केली होती. मात्र, सुशांत आत्महत्या करूच शकत नाही, त्याची हत्या करण्यात आल्याचा दावा त्याच्या कुटुंबाने केला होता. सुशांतच्या चाहत्यांनीही त्याची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करत, त्याला न्याय मिळावा म्हणून सोशल मीडियावर अनेक मोहिमा राबवल्या होत्या. यानंतर सुशांत आत्महत्या प्रकरण, हत्येच्या संशयामुळे सीबीआयकडे सोपवण्यात आले होते. मात्र सुशांतने आत्महत्या केल्याचं तपासात उघड झालं होतं.
अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी सुरु झालेल्या सीबीआय चौकशीत सिद्धार्थ पिठानीने सुशांतची बहीण मितू सिंह, प्रियंका, तिचे पती ओपी सिंह या तिघांची नावं घेतली होती. मितू आणि प्रियंका यांना 14 तारखेला फोनवर सुशांतच्या आत्महत्येबाबत माहिती दिल्याचा दावा सिद्धार्थ पिठानीने केला होता. प्रियंका आणि मितू यांच्या सांगण्यावरुन सुशांतचा मृतदेह फासावरुन खाली उतरवल्याचे देखील सिद्धार्थने सांगितले होते. दीपेशने चाकूने पंख्याला लागलेला दोर कापला होता, तर आपण मृतदेह खाली काढला, असे सिद्धार्थने सीबीआयला सांगितले होते.