भोर : पुणे-सातारा महामार्गावर असणाऱ्या केळवडे (ता. भोर) गावच्या हद्दीत सुरु असलेल्या रंगील पार्टीवर ग्रामीण पोलिसांनी छापा टाकला. नशेत तर्र होऊन डान्स करणाऱ्या मुलींवर पैशाची उधळण करणाऱ्या १३ जणांना ताब्यात घेतले. या सर्वांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
छाप्यात सागर रमेश जाधव (३२, रा. खडकवासला कॅनॉल शेजारी, हवेली), सुनील निवृत्ती पाठक (३३, रा. दत्तनगर गणेश मंदिराशेजारी धनकवडी, पुणे), विकी वसंत शेलार (२५, रा. केळवडे, ता. भोर), गणेश विजय कदम (३३, रा. पद्मावती मंदिराशेजारी पद्मावती, पुणे), अविनाश संजय साखरकर (२४, रा. विश्रांतवाडी घोलप वस्ती गणेश मंदिराजवळ, पुणे), विशाल गणेश पासलकर (३८, रा. निलगिरी कंपाऊंड आंबेगाव पठार, पुणे), सचिन लक्ष्मण शिंदे (३७, रा. धनकवडी पोलीस चौकी शेजारी फाईव्हस्टार सोसायटी पुणे) या मुलांसह पुणे जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या ५ आणि ठाणे जिल्ह्यातील एका मुलीला ताब्यात घेतले. त्यांची चौकशी करून कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी वेळोवेळी दिलेल्या आदेशाचे व उपाययोजनांचा भंग केला म्हणून त्यांच्यावर राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजगड पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, केळावडे येथील सुमित प्रकाश साप्ते (रा. गाऊडदरा, ता. हवेली) यांच्या मालकीच्या केळवडे येथे असलेल्या दुमजली बंगल्यामध्ये रंगीबेरंगी लाईटचा उजेड करून व मोठ्या आवाजाचा साऊंड लावून मुलं आणि मुली नृत्य करीत होत्या. या फार्म हाऊसवर डान्स चालू असून पैशाची उधळण सुरू आहे, अशी माहिती पुणे ग्रामीण पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाली.
ही माहिती त्यांनी राजगड पोलीस ठाण्यात तातडीने कळविली. त्यानंतर शनिवारी (दि. २९) दुपारी सव्वा दोन वाजता पोलिसांनी या फार्म हाऊसवर छापा टाकला.
उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील, विभागाचे पोलिस निरीक्षक संदीप घोरपडे यांच्यासह उपनिरिक्षक श्रीकांत जोशी, हवालदार एस. एन. कार्लेकर, गायकवाड, श्रीमती एस. आर. कुतवळ, अमोल सूर्यवंशी यांच्या पथकाने ही कारवाई केली. तपास पोलीस उपनिरिक्षक श्रीकांत जोशी करत आहेत.