पुणे : बाणेर येथील डेडीकेटेड कोविड सेंटरमधील डॉक्टर, सुरक्षा अधिकाऱ्यास शिवीगाळ करून मारहाण करणाऱ्यांमध्ये एका पोलिस कर्मचाऱ्याचाही सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. संबंधीत पोलिस कर्मचारी हा गुन्हे शाखेच्या युनीट तीनमध्ये कार्यरत आहे. पोलिस कर्मचारी आणि त्याच्या भावाचाच या प्रकरणामध्ये सहभाग आहे.
पोलिस नाईक सचिन सिद्धेश्वर गायकवाड (४०) आणि त्याचा भाऊ सागर सिद्धेश्वर गायकवाड (३५) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी ठाण्यात डॉ. अजयश्री अधिकराव मस्कर (२५) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. मस्कर हे डेडीकेटेड कोविड केअर सेंटरमध्ये वैद्यकीय व्यवस्थापक म्हणून काम पाहतात. सोमवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास डॉ. मस्कर हे कोविड सेंटरच्या कार्यालयात बसले होते. त्यावेळी सागर गायकवाड त्यांच्या कार्यालयात आला. त्याने कोविड केअर सेंटरमध्ये दाखल असलेला रुग्ण प्रवीण जाधव याचा भाचा असल्याचे सांगितले. त्याने “तुम्ही आमचे फोन का उचलत नाही?” असा प्रश्न विचारीत डॉक्टर आणि तेथील कर्मचाऱ्यास शिवीगाळ केली. तसेच त्यांना मारण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी तेथील सुरक्षा अधिकारी भांडणात पडल्याने त्यांनी सुरक्षा अधिकाऱ्यास मारहाण केली.
या प्रकरणानंतर डॉ. मस्कर, त्यांच्या येथील कर्मचारी हे महापालिकेच्या सुरक्षारक्षकांसमवेत बाणेर पोलिस चौकीत तक्रार देण्यासाठी गेले होते. कोविड सेंबरमध्ये घडलेल्या प्रकाराची माहिती देत असताना सागर गायकवाड आणि सचिन गायकवाड यांनी तेथे प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी डॉक्टर आणि सुरक्षा अधिकारी अजित गजमल यांना मारहाण केली, असे तक्रारीमध्ये नमूद करण्यात आले आहे.