गोल्डमॅन दत्ता फुगे यांच्या खूनातील आरोपीकडून तीन पिस्टल जप्त

0

पिंपरी : गोल्डमॅन दत्ता फुगे याच्या खूनातील पॅरलवर सुटलेल्या आरोपीसह त्याच्या साथीदार टोळीच्या भोसरी पोलीसांनी मुसक्या आवळल्या आहेत. या शिवाय भोसरी परीसरात वाहन चोरी तसेच जबरी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर देखील भोसरी पोलीसांनी कारवाई केली आहे. या कारवाई मध्ये पोलीसांनी वाहन चोरीचे एकुण 21 गुन्हे, जबरी चोरीचे 03 गुन्हे, अवैधरित्या शस्त्र बाळगलेले 03 पिस्टल आणि 06 जीवंत काडतुस असा एकुण 18 लाख 95 हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पत्रकार परीषदेत दिलेल्या माहितीनुसार, भोसरी पोलीसांनी वाहन चोरट्यांचा शोध घेण्यासाठी दोन स्वतंत्र तपास पथक तयार केले होते. सहायक पोलीस निरीक्षक कैलासे यांच्या नेतृत्वाखाली एक आणि दुसरे पोलीस उपनिरीक्षक महेंद्र गाढवे यांच्या नेतृत्वाखाली एक अशी दोन पथके वाहन चोरट्यांचा शोध घेत होते.

पोलीस शिपाई सुमित देवकर यांना मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय संतोष मोरे (वय- 24 वर्ष), राहुल गणेश पाटिल (वय- 23 वर्ष ), अक्षय बब्रुवान खोसे (वय- 21 वर्ष) आणि गणेश बबन जानराव (वय- 22 वर्ष ) या वाहन चोरांना पथकाने सापळा लावुन अटक केले. तर दुसऱ्या पथकातील पोलीस शिपाई आशिष गोपी यांना मिळालेल्या माहितीनुसार, अशरद हनिफ सय्यद (वय-21 वर्ष) आणि अनिकेत सचिन झेंडे ( वय 20 वर्ष) यांच्यासह दोन विधी संघर्षित बालकांना पथकाने ताब्यात घेतले आहे.

चौकशी अंतर्गत त्यांच्याकडुन एकुण 13 गुन्हे उघडकिस आणुन एकुण 09 लाख 10 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या टोळीकडुन भोसरी, भोसरी एमआयडीसी, चाकण, चिंचवड, कोथरुड, स्वारगेट, सहकारनगर, राजगड पोलीस, दिघी आणि सांगवी या पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या वाहन चोरीचे एकुण 21 गुन्हे उघडकिस आणले आहेत.

भोसरी पोलीसांची कारवाई सुरु असताना कासारवाडी व दापोडी परीसरात रात्रीच्या वेळी वाहनांना अडवुन त्यांना हत्याराचा धाक दाखवुन लुटमार सुरु असल्याची माहिती पोलीस शिपाई सागर जाधव यांना मिळाली होती.
त्या अनुषंगाने राजेश बैजु नेटके (वय-23 वर्ष) याला पोलीसांनी ताब्यात घेतले असता त्याने साथीदार सागर राजु नायर (वय-19 वर्ष) आणि सिद्धार्थ उर्फ भाव्या (रा. कासेवाडी, झोपडपट्टी, पुणे) यांच्या मदतीने जबरी चोरी करीत असल्याचे पोलीसांना सांगितले. पोलीसांनी त्यांच्याकडुन एकुण 52 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. भोसरी आणि सांगवी पोलीसांनी एकुण 03 जबरी चोरीचे गुन्हे उघडकिस आणले आहेत.

पोलीस शिपाई गणेश सावंत यांना माहिती मिळाली की, काही इसम विनापरवाना पिस्टल जवळ बाळगुण फिरत आहेत. यामध्ये गोल्डमॅन दत्ता फुगे यांच्या खूनातील पॅरल वर सुटलेला आरोपी देखील आहे. पोलीसांनी तत्काऴ प्रसन्ना उर्फ सोनु ज्ञानेश्वर पवार (वय- 26 वर्ष), अंकुश उर्फ तात्या रंगनाथ डांगले (वय- 29 वर्ष), प्रमोद उर्फ कक्का संतराम धौसपूरीया (पॅरल वर सुटलेला खूनातील आरोपी) यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांच्याकडे 03 पिस्टल, 06 जीवंत काडतुसे असा एकुण 93 हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल मिळुन आला.

अशा प्रकारे भोसरी पोलीसांनी वाहन चोरीचे 21 गुन्हे, जबरी चोरीचे 03 गुन्हे आणि अवैधरित्या शस्त्र बाळगलेले तीन पिस्टल आणि 06 जीवंत काडतुस असा एकुण 18 लाख 95 हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त मंचक इप्पर, सहायक पोलीस आयुक्त डॉ. सागर कवडे, भोसरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक कैलासे, पोलीस उपनिरीक्षक महेंद्र गाढवे, पोलीस हवालदार आर.व्ही. बोयणे, राजेंद्र राठोड, पोलीस नाईक राजेंद्र राठोड, किरण करे, आशिष गोपी, विनायक म्हसकर, अजय डगळे, हिंगे, विधाते, पोलीस शिपाई महाडिक, रासकर, सागर जाधव, वीर, सावंत, सागर भोसले, देवकर यांच्या पथकाने हि कामगिरी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.