हाफकिन बायोफार्माला सरकारकडून १५९ कोटींचे अनुदान

0

नवी दिल्ली : देशात लशींचा तुटवडा असल्याने अनेक ठिकाणी लसीकरण केंद्रे बंद आहेत. त्यामुळे लस उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात असून, आता मुंबईस्थित हाफकिन बायो फार्मास्युटिकल कॉर्पोरेशन लिमिटेडला कोरोनावरील कोव्हॅक्सिन लसीचे एका वर्षात २२.८ कोटी डोस तयार करण्याची परवानगी देण्यात आली आहे. हे उत्पादन मुंबईतील परेल कॉम्प्लेक्समधील कंपनीत करण्यात येणार आहे. त्यासाठी हाफकिन बायोफार्माला १५९ कोटींचे अनुदान जाहीर करण्यात आल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली.

हाफकिन बायोफार्माला भारत बायोटेक लिमिटेडने हस्तांतरण व्यवस्थेनुसार कोव्हॅक्सिन लस उत्पादनाचे तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले आहे. कोव्हॅक्सिन लस उत्पादनासाठी हाफकिन बायोफार्माला देण्यात येणा-या एकूण अनुदानात केंद्र सरकारकडून ६५ कोटी तर महाराष्ट्र सरकारकडून ९४ कोटी रुपयांचा वाटा आहे. कंपनीला लसनिर्मितीसाठी ८ महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. लस उत्पादनासाठी २ टप्पे निश्चित करण्यात आले आहेत. लस निर्मितीसाठी आवश्यक औषधांची निर्मिती आणि त्यानंतर लस निर्मिती असे दोन टप्पे असणार आहेत. औषध निर्मितीसाठी बायो सेफ्टी लेव्हल पाळणे गरजेच आहे. हाफकिनकडे याबाबतची योग्य सुविधा आहे, असे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संदीप राठोड यांनी सांगितले.

१२२ वर्षांच्या संस्थेची शाखा
हाफकिन फार्मास्युटिकल कॉर्पोरेशन लिमिटेड ही १२२ वर्षे जुन्या हाफकिन संस्थेची शाखा आहे. देशातील सर्वात जुन्या बायोमेडिकल संशोधन संस्थांपैकी एक आहे. प्लेगवरील लसीचा शोध लावणा-या रशियन बॅक्टेरियोलॉजिस्ट डॉ. वॉल्डेमार हाफकीन यांच्या नावावरून या संस्थेला नाव देण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.