पिंपरी : गस्तीवर असताना संशयितरित्या अंधारात बसलेल्याना हटकल्याने टोळक्याने गस्तीवरील पोलिसांवर दगडफेक केली. यात एक पोलीस अंमलदार जखमी झाला आहे. ही घटना सांगवी येथील बाबुरावजी घोलप महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर शुक्रवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घडली.
पोलीस अंमलदार अमोल लावंड असे जखमी झालेल्या पोलिसांचे नाव आहे. सांगवी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमोल लावंड आणि कल्याण भोसले हे दोघे रात्री गस्त घालत होते. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास त्यांना घोलप महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ अंधारात काही जण थांबले असल्याचे दिसले. त्यांनी वाहन थांबवून त्यांना आवाज देऊन हटकले अमोल लावंड हे पुढे होते.
पोलिसांना पाहून त्या टोळक्याने त्यांच्या दिशेने दगडफेक करण्यास सुरुवात केली. त्यात लावंड हे जखमी झाले. पोलिसांच्या वाहनाचेही नुकसान झाले. त्यानंतर हे टोळके पळून गेले. ही घटना समजताच पोलीस घटनास्थळी पोहचले यांनी अमोल लावंड यांना रुग्णालयात दाखल केले. तपास सांगवी पोलीस करीत आहेत.