श्रीवर्धन : श्रीवर्धनच्या विकासासाठी राज्य सरकारकडून 30 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. श्रीवर्धन बीच सुशोभिकरणाचा नारळ उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाढवला. प्रीवेडींग शूट करण्यासाठी श्रीवर्धनला येणाऱ्या जोडप्यांची प्रकरणं पोलीस ठाण्यात जातात, मात्र त्यांना चांगली वागणूक द्या, जेणेकरुन त्यांनी हनिमूनलाही इथेच आलं पाहिजे, असं मिश्किल वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं.
अजित पवार यांनी श्रीवर्धन बीच सुशोभिकरण प्रकल्पाचे भूमिपूजन केले. यावेळी अजितदादांनी बीचची पाहणी केली. तसेच तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाचा आढावा घेतला. बीच सुशेभिकरण, लॅंडस्केपिंग, झाडांची लागवड, वादळात हॉटेल कसे टिकतील, या सगळ्यांची इंजिनिअरकडून माहिती घेतली. यावेळी श्रीवर्धन लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे, त्यांच्या कन्या आमदार अदिती तटकरे उपस्थित होत्या. बीचच्या वाळूबद्दल माहिती घेत तिचा रंग काळा पडल्याबद्दल अजित पवारांनी चिंता व्यक्त केली.
प्रीवेडिंग शूटसाठी इकडे कपल येतात, पण त्यांना श्रीवर्धनमध्ये स्थानिक लोक अडवतात, फोटो काढू देत नाहीत, वादावादी होते, प्रकरणं पोलीस स्टेशनपर्यंत जातात. पण असं करु नका, अडवू नका. त्यांना फोटो काढू द्या, इथलं पर्यटन इतकं वाढवा की लग्नानंतर जोडपी हनिमूनलाही इकडेच आली पाहिजेत. अॅनिव्हर्सरी असो, बर्थ डे असो सगळे कार्यक्रम इकडेच झाले पाहिजेत, असं इथलं पर्यटन वाढवा, असं अजित पवार मिश्कीलपणे म्हणाले. त्यावर, श्रीवर्धनचं गतवैभव पुन्हा अधोरेखित करु. निसर्गाने नटलेल्या परिसराचा विकास करु, कोकणाला अजितदादांकडून भरभरुन मिळेल, असं सुनिल तटकरे म्हणाले.
पाच वर्षात चार वादळं आली. सरकार पाठिशी आहे, केंद्र सरकारचे नियम लहान असतील तरी साडेतीन पट पैसे देण्याचं काम राज्याने केलं. कोरोना कसा अटॅक करेल सांगता येत नाही. नियम ठरवून दिल्याप्रमाणे पालन करण्याचं आपलं काम आहे. आततायीपणा जीवावर बेततोय. कुणालाही वाटलं नव्हतं की महाराष्ट्र विकास आघाडीची स्थापना होईल, कामाला सुरुवात करताच कोरोनाने प्रवेश केला, असं अजित पवार म्हणाले.