पुणे : हडपसर परिसरात राहणाऱ्या दहा वर्षाच्या भाचीवर बलात्कार करणा-या मामास न्यायालयाने १४ वर्ष सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. यू. मालवणकर यांनी हा निकाल दिला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी ३१ वर्षीय महिला या महिला धुणेभांडीचे काम करता. शिक्षा सुनावलेली व्यक्ती फिर्यादी यांच्या घराशेजारी त्याच्या आर्इ आणि बहिणीसह रहायला आला होता. ११ डिसेंबर रोजी दुपारी तक्रारदार महिला आरोपीच्या घरी पाणी आणण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी आरोपीने घराचा दरवाजा उघडला असता त्याची दहा वर्षाची भाची घाबरून रडत-रडत घराबाहेर पडली.
तक्रारदार महिलेने याबाबत तिला घरी नेऊन विश्वासात घेऊन चौकशी केली असता, तिने मामाने माझ्यावर अत्याचार केल्याचे सांगितले. त्यानंतर महिलेने मुलीच्या वडिलांचा फोन नंबर मिळवून त्यांना ही घटना सांगितली. त्यामुळे ते घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी आरोपीला पोलिसांच्या हवाली केले. याबाबत हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्यात विशेष सरकारी वकील सुनील हांडे यांनी एकूण सात साक्षीदार तपासले.
मुलीच्या वैद्यकीय तपासणीत आरोपीने तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याचे सिद्ध झाले. पिडितेचा जबाब आणि वैद्यकीय अहवाल महत्त्वपूर्ण मानत न्यायालयाने आरोपीला बलात्कार व पोस्को कायद्यानुसार दोषी ठरवत १४ वर्ष सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या गुन्ह्याचा तपास हडपसर पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रूपाली माळी यांनी केला. न्यायालयीन कामकाजात त्यांना पोलीस कर्मचारी ए. एल. गायकवाड यांनी मदत केली.