पुणे : पुणे लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्रसिंग गौड यांच्यासह पोलीस ठाण्यातील 8 पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. अप्पर पोलीस महासंचालक कार्यालयाकडून हे निलंबन झाले आहे. आरोपींवर तात्काळ कारवाई न करता त्यांना हॉटेलात ठेवले व कारवाईला वेळ घालवला असा ठपका ठेवत त्यांचे निलंबन केले आहे. या कारवाईने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
पोलिस निरीक्षक सुरेंद्र गौड, पोलीस शिपाई संतोष विष्णू लाखे, माधव मारुती झेंडे, गणेश अशोक शिंदे, श्रीकांत मार्केंडय बोनाकृती, गंगाधर केशाव, अशोक अकबर गायकवाड आणि कैलास प्रकाश जाधव पोलिस दलातून निलंबन झालेल्याची नावे आहेत.
पुणे लोहमार्गच्या पुणे रेल्वे पोलिसांनी 2020 मध्ये अमली पदार्थाचे मोठे रॅकेट पकडले होते. या प्रकरणी दोघा जणांना पकडले होते. थर्टी फस्टच्या आयोजित पार्ट्याना हे अमली पदार्थ पुरवले जाणार होते, असे त्यावेळी सांगितले जात होते. यात 1 कोटी 3 लाख रूपयांचा चरस पकडला गेला होता. हिमाचल प्रदेश येथून हे चरस आणले जात होते. डिसेंबर 2020 ला ही कारवाई झाली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मात्र, कालांतराने हा गुन्हा तपासासाठी एटीएसकडे वर्ग करण्यात आला. त्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना एटीएसला या आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर तत्काळ गुन्हा दाखल न करता विलंब केला. अंमली पदार्थांसह ताब्यात घेतलेल्या आरोपींवर तत्काळ कारवाई न करता त्यांना काही दिवस पुणे रेल्वे स्टेशन जवळील हॉटेलमध्ये ठेवल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. एटीएसने आरोपींचा ताबा घेत चौकशी सुरू केली. त्यात जबाब घेण्यात आला असता हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.