कोरोना रुग्णांना महापालिका रुग्णालयच ठरतंय वरदान

तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन नवीन जिजामाता रुग्णालयात लहान मुलांसाठी 'बेड'

0

पिंपरी : मार्च महिन्यापासून संपूर्ण जगाला कोरोनाचा विळखा बसला आहे. राज्यात सर्वाधिक रुग्ण हे पुणे जिल्ह्यात आढळून आले. अश्यातच पिंपरी चिंचवड परिसरातही कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली. दुसऱ्या लाटेत रुग्णांच्या मृत्युचे प्रमाण वाढल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याचवेळी पिंपरी चिंचवड महापालिकेचे ‘जिजामाता’ रुग्णालय रुग्णांसाठी एक वरदानच ठरले आहे. दुसऱ्या लाटेत 1960 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

कोरोनाचा शिरकाव शहरात झाल्यानंतर सुरुवातीला वैद्यकीय यंत्रणा, प्रशासकीय यंत्रणा कमी पडू लागली. तत्कालीन महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या कार्यकाळात 90 बेडचे नवीन जिजामाता रुग्णालय सुरु झाले. यामध्ये 60 ओटू आणि 30 नॉन ओटू बेड होते. आता यामध्ये 10 बेड वाढविण्यात आले असून 100 बेडचे रुग्णालय झाले आहे.

दुसरी लाट सुरु झाल्यानंतर शहरातील रुग्णालयात बेड उपलब्ध होणे अवघड झाले होते. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे रुग्णांच्या बळीची संख्या वाढत होते. अश्या वेळी रुग्णांना आणि रुग्णांच्या नातेवाईकांना धीर देण्याचे आणि रुग्णांना ठणठणीत करुन घरी पाठवण्याचे काम नवीन जिजामाता रुग्णालयाचे डॉक्टर आणि त्यांची टीम करत होते.

दुसऱ्या लाटेत या रुग्णालयात आज अखेर 1960 रुग्ण उपचार घेऊन घरी बरे होऊन गेले आहेत. तर पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत सुमारे साडे सहा हजार रुग्ण बरे झाले आहेत. शहरातील यशवंतराव चव्हाण, तलेरा, ऑटो क्लस्टर, कोविड जम्बो याही ठिकाणी रुग्णांवर उपचार सुरु आहेत. मात्र येथे उपचार घेऊन बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांचा आनंद काही वेगळाच आहे.

या रुग्णालयात महापालिकेचे अनेक वरिष्ठ अधिकारी, शहतील प्रतिष्ठित व्यक्ती उपचार घेऊन बऱ्या झाल्या आहेत. त्यामुळे शहरवासीयांना हे रुग्णालय वरदानच ठरले आहे. या रुग्णालयात एकूण 120 जणांचा स्टाफ काम करत आहे. यामध्ये 16 डॉक्टर, 22 नर्स, वार्डबॉय, मावशी, साफ सफाई कामगार, ऑफिस स्टाफ, सुरक्षा रक्षक आहेत.

पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत अतिशय चांगले काम होत असल्याने या ठिकाणी तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन लहान मुलांसाठी खास बेडची व्यवस्था करण्याची तयारी आहे. यामध्ये 50 बेड लहान मुलांसाठी तर 50 प्रौढांसाठी (यामध्ये मुलांच्या पालकांना प्राधान्य) अशी व्यवस्था केली जाणार आहे. तर 12 आयसीयू बेडची व्यवस्था करण्यात येणार आहे.

शासनाच्या गाईड लाईन नुसार आम्ही रुग्णालयात रुग्णांवर उपचार करतो आहे. आमचा सर्व स्टाफ कोरोना बाधीत रुग्णाला जास्तीत जास्त आशावादी आणि भितीमुक्त राहण्यासाठी काम करत आहे. यामुळे या रुग्णालयातून 100 टक्के रुग्ण हे पूर्णपणे बरे होऊन घरी गेले आहेत. तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन तयारी सुरू केली आहे.

डॉ. बाळासाहेब होडगर
ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी,
प्रमुख नवीन जिजामाता रुग्णालय
Leave A Reply

Your email address will not be published.