मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्ली येथे भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण उपस्थित होते. दिल्लीत पंतप्रधानांसोबत खलबतं सुरु असताना दुसरीकडे महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजपने तातडीने मिटिंग बोलावली आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ या बंगल्यात भाजपच्या प्रमुख नेत्यांची तातडीची बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीचे नेमकं कारण समजू शकले नाही. परंतु दिल्लीतील ठाकरे-मोदी भेटीच्याच पार्श्वभूमीवर ही चर्चा करण्यासाठी भाजप नेत्यांची बैठक होत असल्याचे सांगण्यात येत आहे.
दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजित पवार आणि अशोक चव्हाण यांच्या तासभरापासून बैठक सुरु आहे. या बैठकीमध्ये मराठा आरक्षण, जीएसटी थकबाकी आणि तौक्ते वादळाच्या नुकसान भरपाई संदर्भात चर्चा सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर निवेदनाद्वारे जीएसटी थकबाकी राज्याला तातडीने देण्याची मागणी केली, असेही सांगण्यात येत आहे.